मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा जमीनदोस्त केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष तिथे जाण्याचे ठरविल्यानंतर तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या या भेटीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. त्यावेळी मंचावर उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणा जितेंद्र आव्हाड देत होते. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते.
ही शाखा जीर्णअवस्थेत असल्यामुळे तोडण्यात आल्याचा दावा केला जात होता. मात्र उद्धव ठाकरे गटाने ही शाखा आमची असल्याचा दावा केला. त्यामुळे दोन्ही गटात गेल्या दोन तीन दिवसांत जोरदार बाचाबाची सुरू होती. संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांना कोण अडवणार ते आम्ही पाहतो. हिंमत असेल तर अडवून पाहा असा इशारा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा हा मुंब्रा दौरा चर्चेचा विषय बनला होता.
उद्धव ठाकरे मुंब्र्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या ताफ्यापुढे जितेंद्र आव्हाड यांची गाडी होती. त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याला मार्गदर्शन केले. तिथे पोलिसांशी त्यांची बाचाबाचीही झाली. पण नंतर घामाघूम झालेले जितेंद्र आव्हाड प्रत्यक्ष त्या शाखेपर्यंतही पोहोचले. तिथे नंतर उद्धव ठाकरे यांचा ताफा अडविण्यात आला. तिथे बॅरिकेट्स टाकण्यात आल्यामुळे गाडी पुढे जाऊ शकली नाही आणि उद्धव ठाकरे यांना माघार घ्यावी लागली.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी छोटेखानी भाषण केले. तेव्हा त्यांच्या मंचावर जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांच्याबाजूला उभे होते. पण हे भाषण संपल्यावर उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा त्यांनी दिल्या. जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीचे आश्चर्य व्यक्त केले गेले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींचे ‘शब्द’ असलेल्या भरड धान्याच्या गाण्याला ग्रॅमीचे नामांकन
१५ किलो औषधं, भाजीपाला घेऊन पहिला ड्रोन दुर्गम भागात पोहचला
सूरत रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू
ललित पाटीलची प्रकृती पुन्हा बिघडली
उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यानिमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडण्यात आल्यावरून आरोप केले होते. पोलिसांना त्यांनी जाब विचारला होता. उद्धव ठाकरे यांचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यावरूनही त्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याला जाब विचारला होता. त्यावरून जितेंद्र आव्हाड हे उद्धव यांच्या या दौऱ्यानिमित्ताने खूप आक्रमक असल्याची चर्चा रंगली.
उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्यात मग भाषण करताना एकनाथ शिंदे गटावर टीका केली. मधमाशीच्या पोळ्याला शिंदे गटाने छेडले आहे, असे म्हणत त्यांना ठाकरेंनी आव्हान दिले.