श्री रामांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांना रोहित पवारांनी सुनावलं

‘एक्स’वर पोस्ट करून दिला खोचक सल्ला

श्री रामांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांना रोहित पवारांनी सुनावलं

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री राम यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्यानंतर खळबळ उडाली आहे. बहुजनांचा राम आहे. राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते, असं वक्तव्य त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यानंतर भाजपा आक्रमक झाली असून अनेक नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांना खडेबोल सुनावले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडूनही जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर मिळाला आहे.

“नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती- जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे,” असा खोचक सल्ला रोहित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे.

“देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे,” असं रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा:

“मुल्लांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी जितेंद्र आव्हाड कुठल्या थराला गेलेत पहा”

महालक्ष्मी रेसकोर्सवर डोळा नेमका कोणाचा?

पुन्हा ईव्हीएम हॅक होतेय, अब की बार ४०० पार…

अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच

राम बहुजनांचा असून शिकार करून मांसाहार करत होता. आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र, आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?” असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.

Exit mobile version