महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे सतत काही ना काही कारणाने चर्चेत असतात. सध्या आव्हाड यांच्या एका डिलीट झालेल्या ट्विटची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कायद्याच्या कचाट्यात सापडत असलेल्या आपल्या समर्थकांच्या पाठीशी उभे राहण्यसाठी आव्हाड मोठ्या तोऱ्यात पुढे सरसावले होते. पण नंतर काही तासांतच आव्हाड यांनी आपले ट्विट डिलीट केले. त्यामुळे आव्हाड असे समर्थकांना पाठ दाखवून का पळाले? असा सवाल केला जात आहे.
देशात एकीकडे कोविडचे थैमान सुरु असतानाच दुसरीकडे यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतात. सोशल मीडिया हा या गोष्टींसाठीचे प्रमुख रणांगण बनलेला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचे समर्थक या रणभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करता असतात. पण अनेकदा हे ‘सोशल योद्धे’ टिपण्णी करताना मर्यादा सोडून बोलताना दिसतात. अशाच एका प्रकरणात मर्यादा सोडून केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचा महाराष्ट्र सचिव मोहसीन शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पुण्यातील ॲड. प्रदिप गावडे यांनी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकत पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या इतर नेत्यांवर मर्यादा ओलांडून बदनामी करणाऱ्या ५४ जणांच्या विरोधात विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा यासाठी तक्रार केली आहे.
हे ही वाचा:
उपमुख्यमंत्र्यांची ‘सोशल’ उधळपट्टी
मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झापले
शिवसेना मंत्र्याला न्यायालयाची चपराक
‘लॅन्सेट’च्या भारतविरोधी लेखामागे ‘चायनाचा हात’
या तक्रारीची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा असून या ५४ जणांच्या यादीत बहुतांश महाविकास आघाडी सरकारचे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत. या तक्रारीची बातमी समजल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून या तक्रारीत नाव आलेल्या ५४ जणांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. “काळजी करू नका. मी जबाबदार व्यक्तींशी या संदर्भात बोललो आहे.” असे आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. एक प्रकारे मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगत आश्वस्त करण्याचा प्रयत्न आव्हाड यांनी केला होता. पण नंतर थोड्याच वेळात आव्हाड यांनी ते ट्विट डिलीट करत त्या समर्थकांना पाठ दाखवली. या ५४ जणांना वाचवणे कठीण आहे हे आव्हाडांच्या लक्षात आल्यामुळेच त्यांनी ट्विट डिलीट केल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान या प्रकरणातले प्रमुख तक्रारदार ॲड.प्रदिप गावडे यांच्याशी न्यूज डंकाने संपर्क साधला असता, “मी काल ज्या व्यक्ती तक्रार दाखल केली होती त्यातील काही लोकांनी राजकीय नेत्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांबद्दल अत्यंत अश्लील टिपण्णी केली होती तर लोकांनी हिंसा करण्यास प्रवृत्त केले होते, काहींनी हिंदूंच्या भावना दुखवणारी वक्तव्य केली होती तर काही नराधमांनी महिलांना बलात्काराची व सामूहिक बलात्काराची धमकी दिली होती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अशा लोकांना वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता हे त्यांच्या ट्विट वरुन स्पष्ट आहे त्यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या आरोपींच्या माघे राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी आहे अशी भूमिका मांडली, महिलांना बलात्काराची व सामूहिक बलात्काराची धमकी देणाऱ्या नाराधमांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हेच पवार साहेबांचे महिला धोरण आहे का असा प्रश्न पडला आहे.” असे प्रदीप गावडे म्हणाले.