विवियाना मॉल मारहाण प्रकरणी आव्हाडांना अटक

कार्यकर्ते आणि प्रेक्षकांमध्ये हाणामारीसुद्धा झाली होती.

विवियाना मॉल मारहाण प्रकरणी आव्हाडांना अटक

काही दिवसांपूर्वी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना चित्रपटगृहात घुसून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढलं होतं. त्यावेळी कार्यकर्ते आणि प्रेक्षकांमध्ये हाणामारीसुद्धा झाली होती. याप्रकरणी आव्हाड यांच्या शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नुकतंचं आता जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सोमवारी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपट सुरु होता. याची माहिती जितेंद्र आव्हाड यांना लागली आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत विवियाना मॉलच्या चित्रपटगृहात गेले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना जबरदस्तीने बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी प्रेक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या मारहाणीत एका प्रेक्षकाचे कपडे फाडल्याचे दृश्य कॅमेरामध्ये कैद झाले होते. या घटनेनंतर वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी आज अटक केली आहे.

अटकेपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी तीन ट्विट करून अटकेची माहिती दिली आहे. दुपारी १ वाजता वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांनी आव्हाडांना फोन केला होता. नोटस घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलवले, अशी माहिती ट्विट करून आव्हाडांनी दिली.

मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, अशा प्रकारचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत.

Exit mobile version