केंद्रात भाजपाला भक्कम पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू असून २३ जून रोजी बिहारमध्ये विरोधकांची बैठक होणार आहे. मात्र, बिहारमध्येच विरोधकांना बैठकीपूर्वी धक्का बसला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा (एचएएम) प्रमुख जीतन राम मांझी यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मांझी यांनी बुधवार, २१ जून रोजी गृहमंत्री अमित शहा यांची ४५ मिनिटे भेट घेतली.
जीतन राम मांझी म्हणाले की, “एचएएम भाजपासोबत असून, २०२४ च्या लोकसभा निवडणुका भाजपा आणि आमचा पक्ष एकत्र लढेल. तसेच काही दिवस दिल्लीत राहून एनडीएच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहे.” बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जीतन राम मांझी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते.
हे ही वाचा:
…आणि पोलीस ठाण्याचे बँक खाते बँक कर्मचाऱ्यानेच केले साफ
राज्यातील साडेतीन लाख युवक-युवतींना मिळणार ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ !
लाखो वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण
जीतन राम मांझी यांच्यावर भाजपाच्या फायद्यासाठी ‘महागठबंधन भागीदारांवर हेरगिरी’ केल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला होता. त्यानंतर ते या युतीतून बाहेर पडले होते. तसेच दिल्लीत नवे पर्याय शोधणार असल्याचेही ते म्हणाले होते. ‘एचएएम’चे प्रमुख जीतनराम मांझी दलित समुदायाचे प्रतिनिधीत्व करतात. शिवाय बिहारमध्ये सुमारे १६ टक्के दलित मतदार आहेत. बिहारमध्ये लोकसभेच्या सहा जागा, तर विधानसभेच्या ३६ जागा दलित समाजासाठी राखीव आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजपासोबत येण्याचा भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे.