केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी झारखंडमधून विरोधकांवर जोरदार निशाणा साधत आदिवासींच्या घटत्या लोकसंख्येवर भाष्य केले. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका पार पडत असून येथे दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. अशातच जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासींच्या घटत्या लोकसंख्येचा संदर्भ देत मोठी घोषणा केली. अमित शाह म्हणाले की, झारखंडमध्ये भाजप सत्तेवर आल्यास राज्यातील आदिवासी मुलींशी विवाह करणाऱ्या घुसखोरांना जमिनींचे हस्तांतरण रोखण्यासाठी कायदा आणण्यात येईल. गृहमंत्र्यांनी असेही सांगितले की, आधीच संपादित केलेल्या जमिनीवर पुन्हा दावा करून ती जमीन मूळ आदिवासी कुटुंबांना परत केली जाईल.
अमित शाह म्हणाले की, “झारखंडमध्ये आदिवासींची लोकसंख्या कमी होत आहे. आमच्या मुलींशी लग्न करून घुसखोर जमिनी बळकावत आहेत. घुसखोरांनी आदिवासी महिलांशी लग्न केल्यास त्यांना जमिनीचे हस्तांतरण रोखण्यासाठी आम्ही कायदा आणू. घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आम्ही एक समितीही स्थापन करू. त्यांनी बळकावलेल्या जमिनींवर पुन्हा हक्क सांगू,” असा इशारा अमित शाह यांनी दिला आहे.
जेएमएमचे माजी दिग्गज चंपाई सोरेन, जे आता भाजपमध्ये सामील झाले आहेत, जेव्हा त्यांनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. घुसखोरी आणि आदिवासींच्या हक्कांबद्दल बोलल्याबद्दल चंपाई सोरेन यांना झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा शाह यांनी केला. “आज संपूर्ण झारखंड आणि विशेषतः आदिवासी भाग घुसखोरीमुळे हैराण झाला आहे. आमच्या चंपाई सोरेन यांनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा हेमंत म्हणाले की, तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडा,” अशी टीका अमित शाह यांनी केली.
हे ही वाचा..
बॅगेची तपासणी होताच उद्धव ठाकरेंची आग-आग
खलिस्तानी दहशतवादी पन्नूनने राम मंदिरावर हल्ला करण्याची दिली धमकी
इराकमध्ये अजब कायदा; आता पुरुषांना ९ वर्षांच्या मुलीशीही लग्न करता येईल !
अमित शाह यांनी आरोप केला की, जेएमएमच्या नेतृत्वाखालील सरकारने १ हजार कोटी रुपयांचा मनरेगा घोटाळा, ३०० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा, १ हजार कोटी रुपयांचा खाण घोटाळा आणि कोट्यवधी रुपयांचा मद्य घोटाळा यासह अनेक मोठ्या प्रमाणात घोटाळे केले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या ३.९० लाख कोटी रुपयांचा सरकारने गैरवापर केल्याचा दावाही त्यांनी केला.