जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मुख्यमंत्री सोरेन यांच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीचे पथक दक्षिण दिल्लीतील शांती निकेतन या निवासस्थानी दाखल झालं आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून त्यांना अटकही होऊ शकते, अशी माहिती आहे. ईडीकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची भीती असल्यामुळे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता झाल्याची नवी माहिती समोर आली आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे जमीन घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रींगमध्ये अडकले आहे. यामुळे ईडीकडून सोमवारी सोरेन यांच्या दिल्ली येथील शांती निकेतन येथील घरासह तीन ठिकाणी छापे मारण्यात आले. सकाळपासून ही कारवाई सुरू होती. रात्री उशिराही शोध मोहीम सुरू होती. परंतु, ईडीच्या पथकाला अद्याप सोरेन यांचा ठिकाणा सापडलेला नाही. यामुळे ईडीने त्यांची एक गाडी जप्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री सोरेन हे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी नसल्यामुळे विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेमंत सोरेन हे शनिवार, २७ जानेवारी रोजी रात्री दिल्लीत दाखल झाले होते. त्यांनी चार्टर फ्लाइटने उड्डाण केले होते. त्यानंतर काही राजकीय बैठका घेण्यासाठी ते दिल्लीला गेल्याची माहिती आहे. परंतु, दिल्लीत त्यांनी ईडी चौकशीबाबत कायदेशीर सल्लाही घेतला. त्यापूर्वी, ईडीने त्यांना दहावे समन्स पाठवले होते आणि २९ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान हजर राहण्यास सांगितले होते. जर ते ईडीसमोर हजर झाले नाही तर पथक त्यांच्या घरी जाऊन चौकशी करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.
हे ही वाचा:
रणजित सावरकरांच्या पुस्तकातून गांधीजींच्या हत्येवर प्रश्नचिन्ह
कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा म्हणजे राजकीय पर्यटन
लोकसभेपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख ठरली!
दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर दिल्लीत ईडीची कारवाई सुरु असताना झारखंडमध्ये हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार रांचीमध्ये दाखल होत असून काँग्रेस आमदार आणि मंत्री मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. शिवाय मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी सुरु असल्याचा आरोप भाजपा नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे.