सायन मध्ये भरदिवसा २ कोटी रुपयांचे सोनं लुटण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. हैदराबाद येथून दागिने घडविण्यासाठी आलेल्या एका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून लूट करण्यात आली. भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर मुंबईत एकच खळबळ उडाली असून व्यापारी, व्यवसायिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अपहरणकर्त्यांनी दिल्ली क्राईम ब्रँच पोलीस असल्याचे सांगून अपहरण केल्याची माहिती या कर्मचाऱ्याने सायन पोलिसांना दिली. हरीराम धनाराम घोटिया असे लुटण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे, तो गिरीराज कॉम्प्लेक्स निळकंठ ऑप्टिकल्स जवळ कुट्टी हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी राहण्यास आहे.हैदराबाद येथे इंडिया मार्ट ज्वेलर्स च्या दुकानात काम करणारा हरिराम याला त्याचा मालक संतोष नरडी यांनी दोन किलो वजनाचे सोन्याचे २० बिस्कीट तसेच काही हिरेजडित दागिने पॉलिश करण्यासाठी मुंबईतील झवेरी बाजार आणि बीकेसी येथे सोन्याचे दागिने बनविण्यासाठी पाठवले होते.
हे ही वाचा:
निफाडमध्ये लव्ह जिहाद, मुलीला अजमेरला पळवले
सचिनने आमच्या तालावर नाचावे अशी अपेक्षा!
धर्मांतरित झालेल्या तरुणाने प्रेयसीचे डोके फोडले; लव्ह जिहादचा उलटा प्रकार
सन २०२७पर्यंत जीडीपीमध्ये भारत जगभरात अव्वल तीनमध्ये येणार
सुमारे दोन कोटी रुपयांचे सोनं आणि दागिने घेऊन हरिराम हा गुरुवारी सकाळी ऑरेंज टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या बसमधून सायन पूर्व द्रुतगती महामार्ग येथील हायवे अपार्टमेंट, येथे उतरला. दरम्यान त्याच्या पाठोपाठ पांढऱ्या रंगाच्या इनोवा मोटार हरिरामच्या पुढ्यात येऊन उभी राहिली, मोटारीतून चार इसम बाहेर आले व त्यांनी ते दिल्ली क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगून त्याला पोलीस ओळखपत्र दाखविले व बळजबरीने मोटारीत बसवून मोटार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे घेऊन आले.
अपहरणकर्त्यांनी हरिराम याला मारहाण करून त्याच्याजवळील सर्व दागिने आणि सोन्याचे बिस्कीट बळजबरीने घेऊन त्याला तेथेच सोडून पळून गेले. या प्रकारामुळे घाबरलेल्या हरिराम याने मालकाला फोन करून झालेला सर्व प्रकार मालकाला सांगितला, मालकाने त्याला तात्काळ सायन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पाठवले. सायन पोलिसांनी हरिराम याच्या तक्रारीवरून पाच ते सहा अनोळखी लुटारू विरुद्ध अपहरण,दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपीच्या मागावर पाठवले आहे.