राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याचा पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला. मात्र अद्याप याचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे याविरोधात जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.
उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाच टीएमसी पाणी मंजूर केलेला अध्यादेश रद्द करा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेकडून उजनी धरण परिसरातील भिमानगर येथे १६ दिवसांपासून आंदोलन करत आहोत. त्या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी १९ मे रोजी पाच टीएमसी पाण्याचा अध्यादेश रद्द केला होता. याबाबतची माहिती सोशल मीडियातून देण्यात आली.
मात्र सात दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप राज्य सरकारकडून उजनी संदर्भातील अध्यादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यामुळे त्यांच्या विरोधात त्वरित टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्याकडे देण्यात आले आहे.
जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा जनहित शेतकरी संघटना गनिमी काव्याने मंत्रालय किंवा त्यांच्या बंगल्यात घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी राज्य शासनाला दिला आहे.
हे ही वाचा:
लॉकडाउन वाढणार का अनलॉक होणार?
हत्येचा आरोप असलेल्या राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला अटक
मराठा आरक्षणावर दहा मिनिटांत सकारात्मक चर्चा?
कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टीन
सोलापूरच्या उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी निंबोळी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्तक्षेपामुळेच हे पाणी वळवण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. त्याला सोलापूरकरांनी विरोध केला.