मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवार, २५ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारला दिलेला वेळ संपल्याने जरांगे पाटील यांनी उपोषणाची भूमिका ठाम ठेवली आहे. सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेट संपला असून ४१ वा दिवस उजाडला तरी सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, असं म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषणाला पुन्हा सुरवात करत असल्याचे स्पष्ट केले.
“आजपासून पुन्हा उपोषणाला बसत असून सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करतंय. अन्न- पाणी घेणार नाही, औषधं घेणार नाही. गावात कुणी आलं तर त्यांना शांततेत माघारी पाठवा,” असं आवाहन जरांगे पाटील यांनी अंतरवलीमधील गावकऱ्यांना केलं आहे. तसेच मराठा आंदोलकांनी उग्र आंदोलन करू नये, शांततेनं आंदोलन करा, आत्महत्या करू नका, असा सल्ला जरांगे पाटील यांनी दिला आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ सप्टेंबर रोजी एक महिन्याचा वेळ मागितला आणि आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे तेव्हा उपोषण सोडलं होतं. मात्र, आता साखळी उपोषणाचे आज पुन्हा आमरण उपोषणात रूपांतर करत आहे. आता या उपोषणात पाणी आणि औषध उपचार घेणार नाही,” असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा:
युएन प्रमुखांकडून इस्रायल- हमासमध्ये युद्धविराम करण्याची मागणी
इस्रायली नागरिकाला बंदी बनवण्यासाठी हमासची ‘ऑफर’!
गरबा खेळताना भोवळ येवून तरुणाचा मृत्यू!
‘प्रधानमंत्री स्वनिधी’चा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा
सर्व गुन्हे दोन दिवसात मागे घेऊ असे सरकारने म्हटले होते, पण ते झाले नाही. त्यामुळे सरकार समाजाची जाणूनबुजून दिशाभूल करतंय, असे दिसत आहे. संभाजीनगर वगळता कोणत्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सरकारने मदत केलेली नाही, आंदोलनात अपघातग्रस्त जखमी लोकांना मदत केली नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली.