वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली

मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर साधला होता निशाणा

वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात दिवसेंदिवस पेटत असताना मनोज जरांगे पाटील सभा घेत आहेत. तर, दुसरीकडे ओबीसी नेत्यांच्याही सभा होत आहेत. यातच खराडीत झालेल्या सभेत केलेल्या वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटलांनी आपला शब्द मागे घेतला आहे. पुण्यातील खराडी येथील सभेत लायकी नसलेल्यांच्या हाती काम करावं लागतंय असं विधान मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं. त्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला होता.

“आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली,” असं वादग्रस्त विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून छगन भुजबळ यांनी जरांगेंचा खरपूस समाचार घेतला होता. मनोज जरांगे पाटलांनी आता यावरून आपले शब्द मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याची कबुली दिली आहे.

“आपल्या बोलण्याचा उद्देश तसा नसून वेगळा होता. याला जाणीवपूर्वक जातीय रंग दिला गेला. शब्दाचा गैरसमज झाला. काही लोकांनी त्या शब्दाचा वेगळा अर्थ जोडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. बोलण्याचा उद्देश तो नव्हता. कारण कधीही जीवनात जातीयवाद केला नाही. गोदापट्ट्यातील लोकांनाही माहितेय की मी कधीही जातीवाद केला नाही. मराठा आरक्षणावरून आमचं ध्येय, मन हटणार नाही. आम्ही आमच्या ध्येयावरून विचलीत होणार नाही. परंतु, काही लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून मी तो शब्द मागे घेतो,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हे ही वाचा:

राष्ट्रपतींवर हत्येच्या कटाचा आरोप करणाऱ्या श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांची उचलबांगडी

इंडिगो विमानात सीट गायब

उत्तर प्रदेशात बारावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत तोंडावर केली लघुशंका!

नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार

जरांगे पाटलांच्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ म्हणाले होते की, “जरांगे पाटलांचं मत योग्य आहे. माझी लायकी काय? मी तर माळी आहे. माझ्या हाताखाली काम करणारा मराठा माझ्यापेक्षा जातीनं मोठा आहे. दलित पोलीस अधीक्षक होतो. त्याच्या हाताखाली उपअधीक्षक मराठा असतो. अधीक्षकांनी काम करूच नये. कारण, त्यांची लायकी नाही. हे नवीन चातुर्वर्ण तयार झालं आहे.”

Exit mobile version