गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू होते अखेर हे उपोषण गुरुवार, १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर थांबलं आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युस देऊन उपोषण थांबवले. त्यानंतर जरांगे पाटलांनी आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासाठी स्वतः लक्ष घालणार आहेत. आधीपासून सांगत होतो की, मराठा समाजाला न्याय देतील तर ते एकनाथ शिंदेचं आहेत. तिच भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे. मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून पाठींबा आहे. आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे. सरकारने एक महिन्यांचा कालावधी मागितला होता. पण, आणखी दहा दिवस घ्या पण टिकणारे आरक्षण द्या,” अशी भूमिका जरांगे पाटलांनी मांडली.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासह इतर निर्णय धाडसाने घेतले आहेत. एकनाथ शिंदे न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत, हे त्यांनी आज समोर येऊन सिद्ध केलं आहे. मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात. राज्यातील मराठा समाजाला एकनाथ शिंदे यांच्याकडून खूप आशा आहे. आरक्षण प्रश्नासाठी एकनाथ शिंदेंच्या मागे लागणार असून इथून पुढच्या काळात आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ देशभरातील पाच शहरांत प्रदर्शित करणार
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेतले, जरांगेंचे उपोषण मागे
केरळमध्ये ‘निपाह’चा पाचवा रुग्ण; मिनी लॉकडाऊन लागू
बिहारमधील ‘वैशाली’ लोकशाही उत्सवात प्रियदर्शी दत्तांच्या पुस्तकाचे प्रकाशन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. गेले १७ दिवस जरांगे पाटलांची समजूत काढण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर १७ व्या दिवशी अखेर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचे सरबत पिऊन जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले.