जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून किशिदा हे भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी येत आहेत. ही परिषद शनिवारी, १९ मार्च रोजी होणार आहे, याच दिवशी किशिदा भारतात पोहचणार आहेत.
१४ वी वार्षिक भारत-जपान शिखर परिषद १९ मार्चला आहे. याआधी भारत- जपान परिषद २०१८ मध्ये टोकियो येथे झाली होती आणि त्यानंतर विविध कारणांमुळे ती रद्द होत राहिली. इंडो-पॅसिफिकमधील भागीदारीसाठी २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात आसाममधील गुवाहाटी येथे शिखर परिषद होणार होती. परंतु त्या वेळी आसाममध्ये मोठ्या प्रमाणात नवीन नागरिकत्व कायदामुळे निदर्शने झाली. त्यामुळे परिषद रद्द करावी लागली होती. २०२० आणि २०२१ मध्ये ही परिषद प्रामुख्याने कोविड-19 महामारीमुळे होऊ शकली नाही. आणि २०२१ हे जपानमधील नेतृत्व बदलाचे वर्ष देखील होते.
यावर्षी ही परिषद चार वर्षानंतर होत आहे. यावेळच्या परिषदेत पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपली भागीदारी आणखी मजबूत करण्यावर चर्चा करणार असल्याचे समोर येत आहे. तर या व्यतिरिक्त, भारत व जपान हे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह क्वाड ग्रुपचे सदस्य आहेत, जे या क्षेत्रात चीनची वाढती पावले रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यावेळी युक्रेन युद्धामुळे भारताची आणि जपानची रशियाबाबत वेगवेगळी भूमिका आहे. पश्चिमेकडील देशांप्रमाणे जपानने रशियाला एकटे पाडण्यासाठी व्यापक आर्थिक निर्बंध लादले आहेत.
हे ही वाचा:
राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?
… म्हणून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा
२०० जणांच्या जमावाने केला बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला
२०२४ ला होणार नवरा विरुद्ध बायको लढत
दरम्यान, ऑक्टोबर २०२१ मध्ये किशिदा पंतप्रधान झाले. पंतप्रधान झाल्यापासून ते पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. यापूर्वी ते जपानचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री राहिले आहेत.