भारतभेटीवर असलेल्या जपानच्या पंतप्रधानांनी भारतात पुढील पाच वर्षांत आणखी ३.२० लाख कोटी रुपयांची (५ ट्रिलियन येन) गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळणार आहे. २०१४मध्ये जपानने भारतात ३.५ ट्रिलियन येन इतकी मोठी गुंतवणूक करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. त्यात आता आणखी वाढ होणार आहे, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी भारत भेटीवर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संयुक्त पत्रकाद्वारे त्यांनी उपरोक्त गुंतवणुकीचे उद्दीष्ट जाहीर केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन देशात हिंदी महासागर क्षेत्रात आणि एकूण जागतिक स्तरावर शांतता, समृद्धी व स्थैर्य कायम राहण्यासाठी संबंध अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. भारत आणि जपान हे ऊर्जेचा सुरक्षित, विश्वासार्ह, स्थिर अशा पुरवठ्याचे महत्त्व जाणतात. त्यातूनच दोन्ही देशांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग जातो.
मोदींनी सांगितले की, किशिदा हे भारताचे जुने मित्र आहेत. जपानचे परराष्ट्र मंत्री असताना आम्ही संवाद साधला आहे. जपान हा भारतात गुंतवणूक करणारा एक प्रमुख देश आहे.
हे ही वाचा:
काश्मीर फाइल्स पाहून घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर चाकूहल्ला; ३ जण जखमी
‘द काश्मीर फाइल्स’ ने मोडला दंगल विक्रम, बाहुबली-२ चा विक्रम मोडण्याच्या मार्गावर
जगात भारी; नरेंद्र भाई! पंतप्रधान मोदी अव्वल
टाटा घेऊन येणार नवे डिजिटल पेमेंट ऍप
२०१४मध्ये आम्ही जे ३.५ ट्रिलियन येन गुंतवणुकीचे उद्दीष्ट ठेवले होते ते आम्ही पार केले आहे. आता आणखी पुढचे पाऊल टाकण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. येत्या पाच वर्षात आम्ही ५ ट्रिलियन येन इतक्या गुंतवणुकीचे उद्दीष्ट ठेवले आहे. म्हणजेच ३.२० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
मोदी म्हणाले की, जपानने फ्राइट कॉरिडोर आणि मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पांसाठी आधीच महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यातील रेल्वे प्रकल्पात आपण चांगली प्रगतीही केली आहे.