एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता चौदा दिवस झाले असून उद्या अनिल परबांच्या घराजवळ जाऊन एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आजपासून अनिल परब यांच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, आता जनशक्ती संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या वतीने अनिल परब यांच्या घरावर आज (२३ नोव्हेंबर) काळी शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अनिल परब यांच्या घरासमोरून ताब्यात घेतले असून याबातीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना सांगितले आहे की, यावरून सरकारने ओळखावे की कर्मचाऱ्यांमध्ये किती उद्रेक आहे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवून न ठेवण्याची सरकारची इच्छा दिसून येत आहे. तसेच त्यांनी जनशक्ती संघटनेच्या या आंदोलनाबद्दल काहीही कल्पना नसल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
ईडी म्हणते, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांना मुलाची साथ
पेंग्विन पुन्हा ‘हाय- वे’च्याच हवाली!
खड्ड्यांमुळे रायफलमधून गोळी सुटली आणि जवानाचा गेला प्राण
पवार-परब बैठकीत साडेचार तास फक्त चर्चा
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता अनेक संघटना आणि लोकप्रतिनिधी सहभागी होत असून त्यामध्ये कोणी आंदोलन केले याची कल्पना नसल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. एसटी कर्मचारी हे आझाद मैदानावर शांततेत आहेत. त्यांच्या जीवन मरणाची लढाई सुरू आहे, असेही ते म्हणाले. सरकारकडून बैठका घेतल्या जातात त्याबद्दलही मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजते. अधिकृत व्यक्तीकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आक्रमक होऊन काहीही करू नका असे आवाहनही गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी कर्मचारी ठाम असून काल आझाद मैदानात सरकारचे तेरावे घालण्यात आले. सदाभाऊ खोत यांनी सरकारचे तेरावे घालणार नंतर चौदावे आणि नंतर थेट अनिल परबांच्या घराजवळ आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता.