भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत रविवारी आणखी एका शिवसेना नेत्याचा घोटाळा उघड करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सोमय्या यांनी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव घेतले आहे. अजित पवार यांच्या जरंडेश्वर घोटाळ्याप्रमाणेच जालन्याच्या अर्जुन खोतकरांनी घोटाळा केला असून त्यात विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रूपाली विश्वास नांगरे- पाटील, त्यांचे सासरे पद्माकर मुळे यांचीही नावे आहेत.
या घोटाळ्याची चौकशी सीबीआय किंवा न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी रविवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. हिंमत असेल, तर माझ्या आरोपाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्जुन खोतकर यांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी केले आहे.
सोमय्या म्हणाले, चोरी केली नाही तर आनंद अडसूळ का लपून बसलेत. अर्जुन खोतकरांच्या जालना सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढला आहे. यावर खोतकरांनी प्रश्न केला आहे की, त्याचा आणि माझा काय संबंध? मात्र, माझ्याकडे त्याची कागदपत्रे आहेत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
योगींच्या खांद्यावर मोदींचा हात, सर्वत्र फक्त त्याचीच बात!
‘एसटी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास सरकारच तेरावं घालणार’
ब्लॅक कॅप्सना भारत व्हाईट वॉश देणार?
जालना साखर कारखान्याचा मालक अर्जुन इंडस्ट्रीज आहे. २०१८ मध्ये अर्जुन शुगर इंडस्ट्रीजची स्थापना अर्जुन खोतकर यांनी केली होती, असा दावाही सोमय्या यांनी केला आहे. जे जरंडेश्वर कारखान्यात अजित पवारांनी केले तेच खोतकरांनी केले आहे. यात सहा शेअर होल्डर आहेत आणि त्या सहा पैकी पाच जण हे खोतकर परिवारातील आहेत.
अर्जुन खोतकरांच्या या साखर कारखान्याची चौकशी बंद केली गेली. मुंबई पोलिसांनी बंद करून अहवाल कोर्टाला दिला. या प्रकरणाची सीबीआय किंवा न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, अशी मागणी सोमय्या यांनी केली. विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे आणि अर्जुन खोतकर हे ९५० कोटींचे मालक आहेत. त्यांनी हा कारखाना बेनामी पद्धतीने का विकत घेतला, असा सवाल त्यांनी केला आहे. या अर्जुन शुगर इंडस्ट्रीजची चौकशी करण्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार असून ईडीचे अधिकारी, सहकार मंत्रालयात जाऊन भेट घेणार आहे आणि येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.