अकोल्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड झाली होती. मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली होती. आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू झाला होता. जय याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे.
मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ता जय मालोकर याला मारहाण झाली होती. या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. जय मालोकरचा मृत्यू झाला त्यावेळी त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे या प्रकरणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जय मालोकर याच्या रिपोर्टमध्ये त्याच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर मारहाण झाल्याचं म्हटलं आहे. शिवाय छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर होत्या, असेही आढळून आले आहे. पोस्टमार्टमवेळी जयच्या मेंदूला सूज होती. मानेवर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूंना गंभीर इजा झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या घटनेमुळे न्युरोजेनिक शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे.
हे ही वाचा :
इस्रो आता शुक्रावरची गुपितं उलगडणार; चांद्रयान- ४ मोहिमेलाही हिरवा कंदील
कोचिंग सेंटरच्या नावाखाली ख्रिश्चन धर्मांतराचा कट, ११ मुलांची सुटका !
गणेश उत्सवात जिहाद्यांकडून ११ ठिकाणी हल्ले
डब्यांसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड टप्परवेअर दिवाळखोरीत!
प्रकरण काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावरुन राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख ‘सुपारीबाज’ असा केला होता. यामुळे आक्रमक मनसे सैनिकांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्यांपैकी जय मालोकर याचा मृत्यू झाला. जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता.