भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे आज मुंबईत येणार आहेत. सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना नड्डा यांचा हा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे. उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी नड्डा उपस्थित राहणार आहेत. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला उखडून फेकण्याची भाषा केली होती. त्यामुळे नड्डा यांच्या या मुंबई दौऱ्यात काही महत्वाच्या घडामोडी घडतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्तन येथील सुप्रसिद्ध प्रशिक्षण संस्था रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आसाम मधील मधील भाजपा आमदारांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. आसाम मधील सत्ताधारी भाजपाचे जवळपास ६५ पेक्षा अधिक आमदार या प्रशिक्षणासाठी मुंबई जवळील उत्तन येथे दाखल होणार आहेत. या मध्ये आसाम सरकारमधील अनेक मंत्र्यांचाही समावेश असून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा हे स्वतः पूर्ण वेळ या प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार, १२ नोव्हेंबर रोजी या प्रशिक्षण वर्गाला सुरुवात होणार असून या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. या आपल्या उदघाटनाची भाषणात नड्डा नेमके काय बोलणार? याची चांगलीच उत्सुकता लागली आहे. तर नड्डा यांच्या उद्घाटन सत्रानंतर लगेचच मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांचे महत्त्वाचे सत्र होणार आहे. या प्रशिक्षण वर्गा व्यतिरिक्त नड्डा यांचा इतर राजकीय कार्यक्रम अद्याप तरी समोर आलेला नाही.