मविआचा जागावाटप घोळ दोन दिवसांत संपला असता तर नक्की फायदा झाला असता

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुनावले

मविआचा जागावाटप घोळ दोन दिवसांत संपला असता तर नक्की फायदा झाला असता

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा घोळ लवकर संपला असता तर आम्हाला फायदा झाला असता, असं मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसंबंधी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगलेला असताना जनतेने महायुतीच्या पारड्यात बहुमत टाकत प्रचंड यश त्यांना मिळवून दिले. दुसरीकडे निवडणुकीपूर्वीचं महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी जागावाटपावरून नाराजी नाट्य रंगल्याचे चित्र होते. मात्र, आता निवडणुकीनंतरही हे चित्र कायम असल्याचे दिसून येत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या नाराजी नाट्यामुळेचं निकालावर परिणाम झाल्याचे माध्यमांसमोर बोलून दाखवले आहे. “मी कोणाचे नाव घेणार नाही. जागावाटपाच्या बैठकांचा वेळ लांबत गेला. एक एक जागेवरून वारंवार त्याचं त्याचं गोष्टी होत गेल्या. राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा घोळ दोन दिवसांत संपला असता तर आम्हाला नक्की याचा फायदा झाला असता. २० दिवस जागा वाटपात गेले. आता हा वेळ घालवण्यामध्ये कोणते षडयंत्र होते का? अशी शंका घेण्यास हरकत नाही,” अशी टीका वडेट्टीवार यांनी नाव न घेता शरद पवार गट आणि ठाकरे गटावर केली आहे.

हे ही वाचा : 

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करावेत

‘बंद करा ती आघाडी!’ ओमर अब्दुल्लांचा इंडी आघाडीवर तोफगोळा

मंडलने मारली होती बंडल, ‘फातिमा शेख’ अस्तित्वातच नाही!

निज्जरच्या हत्येतील भारतीय आरोपींना जामीन

अमोल कोल्हेंनी काँग्रेसला सल्ला न देता आपल्या पक्षाकडे अधिक लक्ष द्यावं- विजय वडेट्टीवार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी वक्तव्य केले की, काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही. याविषयी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “अमोल कोल्हे हे तीनही पक्षांना बोलले असते तर बरं झालं असतं. तीनही पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला कमी द्यावा,” असा खोचक सल्ला वडेट्टीवारांनी अमोल कोल्हेंना दिला आहे.

Exit mobile version