मंगळवार, ८ मार्च रोजी सकाळपासून मुंबईवर आयकर विभागाची धाडसत्रे सुरु आहेत. मुंबईतील शिवसेनेच्या नेते आयकर विभागाच्या कचाट्यात सापडताना दिसत आहेत. नगरसेवक यशवंत जाधव यांच्यानंतर आता अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाची धाड पडली आहे.
संजय कदम यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी आज सकाळीच आयकर विभागाचे पथक दाखल झाले. संजय कदम हे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेनेचे अंधेरी पश्चिमचे संघटक म्हणून ते काम करत आहेत. संजय कदम यांच्या निवासस्थानी आयकर विभाग तपास करत असून बेहिशेबी मालमत्ता, करचुकवेगिरी याचे पुरावे शोधत आहेत.
हे ही वाचा:
जगभर साजरा होतोय महिला दिन! या वर्षी आहे ‘ही’ खास थीम
Exit poll : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचाच डंका
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनालवर आयकर विभागाचे छापे
मंगळवारी संजय राऊत यांची पत्रकार परिषद; यावेळी प्रश्नोत्तरे होणार का?
तर आज सकाळपासून अशाच प्रकारची कारवाई आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्यावरही होताना दिसली. वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीत नाईन अल्मेडा नावाच्या इमारतीत राहुल कनाल यांचे घर आहे. त्यांच्या या घरी आयकर विभागाचे एक पथक सकाळी दाखल झाले. सध्या कनाल यांच्या घराचीही झाडाझडती सुरु असून या तपासातून नेमके काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राहुल कनाल हे शिवसेनेची युवक आघाडी असलेल्या युवासेनेचे पदाधिकारी आहेत. ते एक व्यावसायिक म्हणूनही प्रसिद्ध असून अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटीज सोबत त्यांची सातत्याने उठबस असते. कनाल हे शिर्डी देवस्थानचे विश्वस्त देखील आहेत. कनाल आणि कदम यांच्यावर होत असेलली छापेमारी ही थेट मातोश्रीला इशारा असल्याचे म्हटले जात आहे.