अनिल परबांच्या सीएच्या घरीही आयकर विभागाचे छापे

अनिल परबांच्या सीएच्या घरीही आयकर विभागाचे छापे

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे. यातच आता परब यांचे सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाउंटंटच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.

मंगळवार, ८ मार्च रोजी सकाळपासूनच शिवसेना नेत्यांशी संबंधित लोकांवर आयकर विभागाची कारवाई सुरु झाली आहे. यामध्ये सुरुवातीला अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. सुरुवातीला अनिल परब यांच्या जवळचे शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर छापे मारल्याची माहिती समोर आली तर त्यासोबतच युवासेना प्रमुख आणि आदित्य ठाकरेंचे जवळचे राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाचे पथक दाखल झाले असून तपास होत असल्याचे समजले.

हे ही वाचा:

RTO मधील ‘सचिन वाझे’ असलेल्या बजरंग खरमाटेच्या घरी आयकर विभागाची धाड

शिवसेना नेते संजय कदम यांच्यावर आयकर विभागाची धाड!

कोण आहे हा बजरंग खरमाटे? आमदार भातखळकरांनी विचारला सवाल

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनालवर आयकर विभागाचे छापे

तर यानंतर अनिल परब यांचे निकटवर्तीय आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या पुणे येथील निवासस्थानी आयकर विभागाने धाड टाकली तर दुपारच्या वेळेस अनिल परब यांच्या सीएच्या घरी देखील आयकर विभागाचे पथक पोहोचल्याचे समजते.या संपूर्ण धाडसत्रातून आत्तापर्यंत आयकर विभागाला नेमके काय हाती लागले याची माहिती समोर आलेली नाही. तरीदेखील अनिल परब यांच्या सीएच्या घरी धाड पडल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असतानाच शिवसेनेच्या नेत्यांच्या जवळच्या लोकांवर होणारी आयकर विभागाची कारवाई ही ठाकरे सरकारला धक्का मानला जात आहे.

Exit mobile version