प्रसिद्ध उद्द्योजक पियुष जैन यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. जैन हे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही छापेमारी चांगलीच चर्चेत आली आहे. या छापेमारीतून आत्तापर्यंत तब्बल १५० कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
कर चुकवेगिरीच्या प्रकरणात आयकर विभागाने जैन यांच्यावर कारवाई केली आहे. जैन यांचे निवासस्थान, कार्यलय, फॅक्टरी तसेच त्यांच्या मालकिचा पेट्रोल पंप यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. तर या सोबतच जैन यांच्या मुंबई आणि गुजरात येथील कार्यालयांवरही आयकर विभागामार्फत छापेमारी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
आनंद महिंद्रा म्हणतात, ती जीप मला द्या; मी बोलेरो देतो
चिमुरडी लेकरं गमावलेल्या पालकांवर शिवसेना नेत्यांची अरेरावी
राज्याच्या विधिमंडळात कचऱ्याचे साम्राज्य
सुरुवातीला आनंदपुरी येथील जैन यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले. यावेळी जाताना नोटा मोजायचे यंत्र घेऊनच हे अधिकारी गेले होते. तर याचवेळी मुंबई आणि गुजरात येथील कार्यालयांवर आयकर अधिकाऱ्यांचे पथक धडकले. यासोबतच जीएसटी अधिकारीही जैन यांच्या छापेमारीच्या वेळी उपस्थित होते.
जैन यांनी करचुकवेगिरी केल्याचा ठपका ठेवत ही धाड टाकण्यात आली. ही कर चुकवेगिरी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या धाडीतून १५० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जैन यांची एक परफ्युम कंपनी आहे. गेल्याच महिन्यात समाजवादी पक्षाच्या नावाने एक परफ्युम तयार केले होते. समाजवादी अत्तर असे याचे नाव आहे. या धाडीवरून सध्या उत्तर प्रदेशचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.