शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी ताज्या असतानाच आता आणखीन एका शिवसेना नेत्यावर आयकर विभागाची कारवाई होताना दिसत आहे. मुंबईतील शिवसेना नेते राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. मंगळवार, ८ मार्च रोजी सकाळीच आयकर विभागाचे पथक कनाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीत नाईन अल्मेडा नावाच्या इमारतीत राहुल कनाल यांचे घर आहे. आज सकाळीच कनाल यांच्या या घरी आयकर विभागाचे एक पथक दाखल झाले. सध्या कनाल यांच्या घराची झाडाझडती सुरु असून बेहिशेबी मालमत्ता, करचुकवेगिरी या संबंधी आयकर विभागाचा तपास सुरु आहे. त्यामुळे या तपासातून नेमके काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
हे ही वाचा:
जगभर साजरा होतोय महिला दिन! या वर्षी आहे ‘ही’ खास थीम
Exit poll : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचाच डंका
…आणि काश्मीर फाइल्समुुळे काश्मिरी पंडितांना अश्रु अनावर
मंगळवारी संजय राऊत यांची पत्रकार परिषद; यावेळी प्रश्नोत्तरे होणार का?
राहुल कनाल हे शिवसेनेची युवक आघाडी असलेल्या युवासेनेचे पदाधिकारी आहेत. ते एक व्यावसायिक म्हणूनही प्रसिद्ध असून अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटीज सोबत त्यांची सातत्याने उठबस असते. कनाल हे शिर्डी देवस्थानचे विश्वस्त देखील आहेत. कनाल यांच्यावर होत असेलली छापेमारी ही थेट मातोश्रीला इशारा असल्याचे म्हटले जात आहे.
राहुल कनाल हे महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही या कारवाईला वेगळे महत्व प्राप्त होते. दरम्यान अंधेरी येथे सुनील कदम यांच्यावरही आयटीने धाड टाकली आहे. संजय कदम हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात.