जम्मू-काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नसून लोकशाही जिंकली हे महत्त्वाचं

देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नसून लोकशाही जिंकली हे महत्त्वाचं

जम्मू- काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल चित्र स्पष्ट झाले असून हरियाणामध्ये भाजपाला ऐतिहासिक असे यश मिळाले आहे. हरियाणात भाजपा सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. जम्मू- काश्मीरमध्ये भाजपा सत्तेपासून दूर असली तरी भाजपाला महत्त्वाच्या जागांवर विजय मिळाल्याचे चित्र आहे. जम्मू- काश्मीरमध्ये इंडी आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी केवळ हरियाणाचे बोलणार नाही. जम्मू- काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नाही तर जम्मू- काश्मीरमध्ये भारताची लोकशाही जिंकली आणि भारत जिंकला. कारण जे लोकं म्हणत होते की, कलम ३७० हटवल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील त्यांनी येऊन बघावं की जम्मू- काश्मीरमध्ये आम्ही निवडणुका घेतल्या. जगभरातील मोठ्या देशांचे काऊन्सिल जनरल निरीक्षक म्हणून तिथे आले. त्यांनी देखील सांगितलं की, इतक्या प्रमाणिक निवडणुका आम्ही कधी बघितल्या नाहीत,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

जीएसटी फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार महेश लांगा यांना अटक

वडील, काकांना दहशतवाद्यांनी मारले, पण शगुनने विजय मिळवून दिला रोखठोक संदेश!

मुंबईकरांचे घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार

जम्मू- काश्मीरसह देशातील जनतेला कळून चुकलंय, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं पर्याय

“आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान सांगत होता की, भारताने जम्मू- काश्मीरमध्ये सेनेच्या माध्यमातून कब्जा केलेला आहे. तिथे लोकशाही नाही. जम्मू- काश्मीर भारताचा भाग नाही. पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आपण जम्मू-काश्मीरमध्ये घेऊन दाखवली. जगाने मान्य केलं की, कलम ३७० हटवणं योग्य निर्णय आहे. जम्मू- काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे,” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच या निवडणुकीत भाजपाने केलेली कामगिरी चांगली आहे, असा विश्वास देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केला.

Exit mobile version