‘जाहिरातीमध्ये न पडता डबल इंजिन सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक’

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले मत

‘जाहिरातीमध्ये न पडता डबल इंजिन सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक’

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही चांगलं काम करत आहेत. कोण पुढे, कोण मागे याला महत्त्व नाही. जाहीरातीमध्ये न पडता, डबल इंजिन सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशा आशयाची जाहिरात सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. तसेच या जाहिरातीत सर्वेक्षणाची आकडेवारीही देण्यात आली आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही टक्क्यांनी मागे असल्याचं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे या जाहिरातीनंतर चर्चांना उधाण आलं आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही चांगलं काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून एक चांगलं, लोकप्रिय बजेट मांडलं. सरकारचा परफॉर्मन्स चांगला आहे. तसे सर्वेक्षणातून दिसत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मागे पडले, एकनाथ शिंदे पुढे गेले, या निष्कर्षाला अर्थ नाही,’ असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

‘शिवसेना आणि भाजपा महायुती म्हणून काम करते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांच्या मनात परस्पराद्दल चांगली भावना आहे. कोणाला जास्त पसंती? हे दोघांच्याही मनात येत नाही. दोघे चांगले बॅट्समन आहेत. राज्यातील जनतेला ज्या अपेक्षा आहेत, ते पूर्ण होणं महत्वाचं आहे. त्यामुळे जाहिरातीमध्ये न पडता, डबल इंजिन सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे,’ असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

हे ही वाचा:

ट्यूशन क्लासला दांडी मारून समुद्रकिनाऱ्यावर गेले अन् समुद्रात ओढले गेले

सलग तीन महिने किरकोळ महागाई दर नीचांकी

आनंद महिंद्रांनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

‘बिपरजॉय’मुळे ६७ रेल्वे गाड्या रद्द!

काय आहे जाहिरात?

आजच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर शिवसेनेकडून जाहिरात देण्यात आली आहे. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे असं या जाहिरातीचं ब्रीदवाक्य आहे. तसेच सर्वेक्षणाच्या आधाराने आकडेवारीही या जाहिरातीत देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील २६.१ टक्के जनतेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हवे आहेत आणि देवेंद्र फडणवी यांना पसंती देणाऱ्यांची संख्या होती २३.२ टक्के असल्याचं म्हणण्यात आला आहे.

Exit mobile version