सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निर्णयावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिला ही आमची चूक असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. नाना पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर १६ आमदार निलंबित झाले असते, असं अजित पवार म्हणाले. त्यावेळच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी कोणाला न सांगता राजीनामा दिला. तो द्यायला नको होता. राजीनामा दिल्यावर कळलं की राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेलं हे पद महाविकास आघाडीकडून तातडीने भरलं गेलं नाही. ते भरलं गेलं असतं तर १६ आमदार अपात्र ठरले असते. मी याबाबत कोणाला दोष देत नाही पण महाविकास आघाडीकडून हे पद भरायला हवं होतं, अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यापासून विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. मात्र, नैतिकतेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजीनामा देतील असं स्वप्न पाहू नये, असं अजित पवार म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी यांची उंची आताचे भाजपचे नेते गाठू शकत नाही.
हे ही वाचा:
सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर, निकालात मुलींची बाजी
उद्धव ठाकरे अजूनही स्वतःच्या राजीनाम्याच्या प्रेमात
इम्रान खान यांच्या पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. शिरीन मजारी यांना अटक
कायदा सुव्यवस्था बिघडेल म्हणून चित्रपट न दाखवणे पूर्णतः अयोग्य
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. या निर्णयामुळे पक्षांतर बंदी कायद्याला कितपत अर्थ उरेल किंवा अर्थ राहिल की नाही याची भीती वाटते. राज्यात अशा घटना घडल्या की राजकीय स्थिरतेवर परिणाम होतो. लोकांच्या जनमताचा अपमान होतो, असं अजित पवार म्हणाले.