मराठा आरक्षणाचा कायदा दोन वर्षे असताना ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना अजून नियुक्तीपत्रं देण्यात आलं नाही. कायद्याचा खल केला जात आहे. नियुक्तीपत्रं कसं द्यायचं हे मला शिकवून नका. मी पाच वर्षे खातं संभाळलंय. आजच्या आज मराठा तरुणांच्या नियुक्तीचे आदेश काढा, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
मराठा समाजाने कोल्हापुरात निदर्शने आणि लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. काळ्या फिती लावून करण्यात येत असलेल्या या आंदोलनात चंद्रकांत पाटील यांनीही भाग घेतला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी जे जे लोक आंदोलन करतील त्या आंदोलनात भाजपचा झेंडा न घेता आणि भाजपचा कार्यकर्ता असल्याची ओळख न दाखवता आम्ही सहभागी होणार आहोत, असं मी म्हणालो होतो. त्यानुसार आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत. कोल्हापुरातील सर्व तालमी, सर्व संघटना आणि मंडळांनी पुढाकार घेऊन हे लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. या लाक्षणिक उपोषणाचं पुढे काय होतं हे माहीत नाही. या आंदोलनात भाजपचा अध्यक्ष म्हणून नव्हे तर नागरिक म्हणून मी आलो आहे, असं पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत कोर्टात काय करायचं ते करा. पण दोन वर्षे कायदा असताना मराठा तरुणांच्या लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. त्यांची निवडही करण्यात आली. पण त्यांना नियुक्तीपत्रं देण्यात आलं नाही. त्यात कायद्याचा खल काय करता? मला कायदा आणि नियुक्तीपत्रं कसं काढायचं हे शिकवू नका. मी पाच वर्षे खाते संभाळले आहे. आजच्या आज मराठा तरुणांना नियुक्तीपत्रं देण्याचा आदेश काढा, अशी मागणी त्यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा. पण या सरकारला ही याचिका दाखल करायची नाही. त्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही. १०२व्या घटनादुरुस्तीनुसार मागास आयोग नेमण्याचा अधिकार सरकारला आहे. पण दीड वर्षात हा आयोग स्थापन केला नाही, अशी टीका त्यांनी केली. मराठा समाजातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांची फी भरण्याचं काम सरकार करत नाही. रोज दळण दळत बसता. हे चालणार नाही. सारथी संस्थेचा पत्ता नाही, अण्णासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता कशाचा कशाचा पत्ता नाही, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.
मराठा आरक्षण आणि कोविड या दोन विषयावर राज्य सरकारने दोन दिवसाचं अधिवेशन घेतलं पाहिजे. पण त्यांच्यात हिंमत नाही. सरकारमध्ये हिंमत असेल तर आज संभाजी छत्रपती यांच्या भेटीतच अधिवेशन घेण्याचा निर्णय जाहीर करा, असं आव्हानच त्यांनी दिलं.
हे ही वाचा:
नेते, सेलिब्रिटींकडे वाटण्यासाठी औषध कसं आणि कुठून येतं?- उच्च न्यायालय
४४ दिवसांमधील सर्वात कमी रुग्ण
स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन
महाराष्ट्रातील सत्ताधार्यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी
खासदार संभाजी छत्रपती असो, खासदार उदयनराजे भोसले असो, शिवेंद्रराजे असोत की समरजीतराजे असोत. कुणीही मराठा आरक्षणाचं नेतृत्व करावं. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही ते म्हणाले.