भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार शनिवार, ११ डिसेंबरच्या रात्री घडला. रात्री उशिरा मोदी यांचे ट्विटर खाते हॅक झाले असून त्यावरून क्रिप्टो करंसी संबंधातील एक मेसेज पोस्ट करण्यात आला. अवघ्या काही मिनिटांतच हा मेसेज डिलीट करून पंतप्रधानांचे अकाउंट सुरक्षित करण्यात आले असले तरी देखील अकाउंट नेमके का? आणि कसे हॅक झाले? अशा चर्चा समाज माध्यमांवर रंगताना दिसत आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाज माध्यमांवर चांगलेच सक्रिय असतात. ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रियता असलेल्या जागतिक नेत्यांमध्ये मोदींचा समावेश होतो. पण अशातच ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर खाते अचानक हॅक झाल्याचे निदर्शनास आले. क्रिप्टो करंसी संदर्भातील एक संदेश या खात्यावरून पोस्ट करण्यात आला. ‘भारतात क्रिप्टो करेंसीला मान्यता देण्यात आली असून खालील लिंक वरून आपण मोफत क्रिप्टो करंसी मराठी डाऊनलोड करू शकता’ अशा आशयाचा हा संदेश होता.
हे ही वाचा:
मुंबईत १४४ ‘कलम’; एमआयएमच्या सभेला गर्दी
सौदी अरबमध्ये तब्लिघी जमातवर बंदी
‘ओबीसी आरक्षण संपवण्याचा ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा डाव उघड’
बांधकाम व्यावसायिकाने म्हाडालाच घातला गंडा
अवघ्या काही मिनिटातच हा मेसेज वाऱ्यासारखा पसरला. पण पंतप्रधानांचे खाते हॅक झाल्याचे लगेच पंतप्रधान कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्यांनी हे ट्विट डिलिट केले असून पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून यासंबंधी माहिती देण्यात आली. यामध्येच पंतप्रधान मोदींचे खाते हॅक झाल्याचे सांगण्यात आले. पण ते अकाउंट रिकव्हर करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
सध्या भारतात क्रिप्टो करंसी अधिकृत करण्याच्या संदर्भात चर्चा सुरु आहे. क्रिप्टो करंसी संदर्भात सरकार काय निर्णय घेणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. अशातच पंतप्रधानांचे ट्विटर खाते हॅक करून क्रिप्टो विषयीचे ट्विट केले गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.