ओडिशामधील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे ३५१ कोटींची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली असून यानंतर देशभरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय जवळपास तीन किलो सोन्याचे दागिने प्राप्तीकर विभागाने हस्तगत केले आहेत. यानंतर सर्व स्तरावरून साहू आणि काँग्रेसवर टीका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजपाने आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ ‘मनी हाईस्ट’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरीजशी लावण्यात आला आहे. या सिरीजचे गाणे लावून साहू यांच्याकडील पैशांचे फोटो आणि व्हिडीओ लावण्यात आले आहेत.
भाजपाने पोस्ट केलेला हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर करत म्हटले आहे की, “‘मनी हाईस्ट’ या काल्पनिक कथानकाची भारतात गरज आहे का? काँग्रेस सारखा पक्ष देशात असताना त्यांनी मागच्या ७० वर्षांपासून ‘हाईस्ट’ केलेली आहे, ज्याची मोजदाद अजूनही सुरू आहे.”
काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईचा एक मिनिटांचा व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे. या व्हिडिओत कपाटातून नोटांच्या थप्प्या हस्तगत केल्याचे दिसत आहे. तसेच धीरज साहू यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबतचे फोटो आहेत. तसेच व्हिडिओच्या शेवटी साहू यांच्याकडे किती रोकड जप्त झाली, याची बातमीही दिसत आहे.
In India, who needs 'Money Heist' fiction, when you have the Congress Party, whose heists are legendary for 70 years and counting! https://t.co/J70MCA5lcG
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2023
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील कार्यालयांवर आणि रांची येथील निवासस्थानी ६ डिसेंबर रोजी प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली होती. पाच दिवस साहू यांच्याकडील बेहिशोबी रोकडीची मोजणी सुरू होती. मशीन्स आणि कर्मचारीही ही मोजणी करण्यासाठी कमी पडले होते.
प्राप्तीकर विभागाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. एकाच छाप्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्याची पहिलीच कारवाई असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पाच दिवस १०० हून अधिक अधिकारी, पैसे मोजण्यासाठी ४० मोठ्या मशीन्स आणि जवळच्या एसबीआय बँक शाखेतून छोट्या मशीन्स आणाव्या लागल्या होत्या.
हे ही वाचा :
आरएसएस मुख्यालयाला प्रणब मुखर्जी यांनी भेट दिली तेव्हा…
कर्नाटक राजभवनाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा फोन!
निवडणूक आयोगाने तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांचे निलंबन घेतले मागे!
दिशा सालियन प्रकरणी एसआयटी स्थापनेचे पोलिसांना आदेश
खासदार धीरज साहू कोण आहेत?
धीरज साहू यांचा जन्म रांची येथे २३ नोव्हेंबर १९५५ रोजी झाला. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा राज्यसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. २००९ साली ते पहिल्यांदा खासदार झाले. तर २०१८ साली तिसऱ्यांदा त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली.