पक्ष उद्धव ठाकरे चालवतात की संजय राऊत?

संजय राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर ठाकरे गटातील जिल्हाप्रमुखांना पडला प्रश्न

पक्ष उद्धव ठाकरे चालवतात की संजय राऊत?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी नागपूरमधून महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा करत स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र, संजय राऊत यांनी स्पष्ट केलेल्या पक्षाच्या भूमिकेनंतर नागपूरमधून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष किशोर कुमेरिया यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना त्यांची नाराजी बोलून दाखवत पक्षाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

किशोर कुमेरिया म्हणाले की, “संजय राऊत हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते सातत्याने पक्षाची भूमिका मांडत असतात. परंतु, ते अनेकदा अशी काही वक्तव्ये करत असतात त्यावरून प्रश्न पडतो की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत की नाही. पक्ष उद्धव ठाकरे चालवतात की संजय राऊत चालवतात असा प्रश्न पडेल अशी वक्तव्ये अनेकदा संजय राऊत यांच्याकडून केली जातात,” अशी खंत व्यक्त करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

पुढे कुमेरिया म्हणाले की, संजय राऊत नागपुरमध्ये आले आणि त्यांनी स्वबळाची घोषणा केली. पण, ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी नागपूर शहरातल्या जुन्या कुठल्याही शिवसैनिकाशी चर्चा केली नाही किंवा त्यांच्यासोबत यासंदर्भात बैठक घेतलेली नाही. पक्षाचे नेते म्हणून संजय राऊतांना वक्तव्य करण्याचा अधिकार आहे, परंतु जुन्या शिवसैनिकांशी चर्चा करणं असं काही पक्षात होत नाही. त्यामुळे जुने शिवसैनिक नाराज आहेत. या भागातील निष्ठावान आणि कर्मठ शिवसैनिक आधीच पक्ष सोडून गेले आहेत, असं म्हणत कुमेरिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“ज्या भागातून मी निवडून आलो, तिथे जनता माझ्यावर प्रेम करते आणि त्यांनीच मला चार वेळा नगरसेवक बनवले. महानगरप्रमुख असताना नऊ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर २००७ पासून २०२२ पर्यंत माझ्यावर कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही. २०२२ मध्ये जिल्हाप्रमुख पद देण्यात आले. ज्या भागातून मी निवडून येतो तो विधानसभा मतदारसंघ माझ्याऐवजी दुसऱ्याच्या ताब्यात दिला जे पाच पक्ष बदलून आलेत. निष्ठावान आणि सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत आहोत. यासंदर्भात मातोश्रीवर अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु यावर चर्चाही नाही आणि त्यांची भेटही झालेली नाही. हा अन्याय झालेला आहे. सरकार असताना ३०- ३५ वर्ष काम करणाऱ्याला काहीच मिळाले नाही जे मिळाले ते बाहेरच्या लोकांना दिले,” असं जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी सांगितले.

हे ही वाचा:

इस्रोची ऐतिहासिक कामगिरी; दोन उपग्रह अंतराळात जोडले

महाकुंभ मेळा: १० देशांची २१ सदस्यीय टीम त्रिवेणी संगमात करणार स्नान

अदानींवर आरोप करणाऱ्या हिंडेंनबर्गला टाळे!

संभल वीजचोरी: खासदार झियाउर रहमान बर्क, १६ मशिदी, दोन मदरशांसह १,४०० एफआयआरची नोंद

जुने शिवसैनिक हे पक्षाच्या सध्याच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत. पक्षाचा स्वबळाचा आदेश नक्कीच पाळला जाईल, परंतु ज्यापद्धतीने बाहेरचे लोक पक्षात आले त्यांचा मानसन्मान होतो, पैसे असणाऱ्यांचा मानसन्मान होतो आणि निष्ठावंतांना डावलले जाते आहे त्यामुळे जुने, निष्ठावान शिवसैनिक नाराज आहेत. याचंमुळे ते दुसऱ्या पक्षात निघून गेलेत, असंही किशोर कुमेरिया यांनी म्हटले आहे.

Exit mobile version