अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात राणा दाम्पत्य चर्चेत आहे. राणा दाम्पत्य मुंबईत हनुमान चालीसा पठणासाठी आले होते, त्यांच्यावर ठाकरे सरकारने कारवाई केली. या दरम्यान, मंगळवारी, १० एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेनेवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकार आडनाव बघून कारवाई करत असल्याचा घणाघात शेलारांनी केला आहे. असा भेद सरकारने करू नये असंही शेलार म्हणाले आहेत.
शेलार म्हणाले, शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई पालिकेला कारवाईसाठी केवळ राणा, राणे, राणावत, कंबोजच दिसतात का? पालिकेला खान, पठाण, शेख यांच्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचे दिसत नाही का? असा सवाल शेलार यांनी केला आहे. आडनावावरुन कारवाया केल्या जात आहेत असा आरोपही यावेळी आशिष शेलार यांनी केला. सरकारने असा भेद करु नये असंही ते म्हणाले आहेत.
गेल्या २५ वर्षात खान, पठाण, शेख यांनी कधी अनधिकृत बांधकाम केलेलं नाही का? असाही सवाल त्यांनी केला आहे. मुंबई महानगर पालिका आडनाव बघून अनधिकृत बांधकामाच्या कारवाया करतेय. शेलारांनी हे देखील स्पष्ट केले की, ते कोणाच्या विरोधात नाहीत मात्र मुंबई महानगर पालिका ज्या पद्धतीने भेदभाव करत आहे त्याला आमचा विरोध असल्याचे शेलार म्हणाले.
हे ही वाचा:
ममता बॅनर्जीनी दिला स्वतःलाच पुरस्कार
‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!’ राज ठाकरेंचा लेटरबॉम्ब
चिनी कंपन्यांचा पाकिस्तानला धक्का
संगीताचा ‘अंतर्ध्वनी’ टिपणारा संगीतपूजक
पुढे ते म्हणाले, एएनआयने काल मुंबईत धाडी टाकून दाऊदच्या हस्तकांवर कारवाई केली. मात्र, राज्यातील पोलिस हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. हाच केंद्र सरकार आणि ठाकरे सरकारमधील फरक आहे. राष्ट्रवादी, हिंदुवादी आणि ढोंगी राज्य सरकारमधील हा फरक असल्याची टीका शेलारांनी केली आहे. आमचा कोणत्याही जाती धर्माला विरोध नाही. मात्र, दिल्लीतील शाहीनबाग, जहांगिरपुरीतील अतिक्रमणांवर ज्याप्रमाणे कारवाई होती, तशीच कारवाई मुंबईतील नागपाडा, बेहरामपाडा, मोहम्मद अली रोड येथे का होत नाही?असा सवाल शेलारांनी केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून मी राजकारणात आहे. एकदाही या भागात अतिक्रमणविरोधी कारवाई झालेली नाही. या अतिक्रमणांकडे सरकार का दुर्लक्ष करते, असा सवालही आशिष शेलार यांनी केला.