मुंबईतील शिवसेना आमदाराच्या स्टंटबाजीमुळे एका कंत्राटदाराच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याची शक्यता आहे. हे आमदार दुसरे कोणी नसून चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे आहेत. दिलीप लांडे यांनी रविवार, १३ जून रोजी एक पब्लिसिटी स्टंट करत नालेसफाई कंत्राटदारावर कचरा टाकायचा प्रताप केला होता. या घटनेच्या दुसर्याच दिवशी त्या कंत्राटदाराला श्वसनाचा त्रास सुरू झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात पहिल्याच पावसात मुंबई तुंबून गेल्यामुळे शिवसेना शासित मुंबई महापालिकेच्या कारभाराची चांगलीच पोलखोल झाली. विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीकडून कायम असा आरोप केला जात होता की मुंबई महापालिका करत असलेल्या नालेसफाईचा दावा झूट असून यात खूप मोठा घोळ आहे. पहिल्याच पावसात अवघ्या काही तासातच तुंबलेल्या मुंबईमुळे भाजपच्या आरोपांवर शिक्कामोर्तबच केले.
या सार्यातून आपली जबाबदारी झटकण्यासाठी शिवसेनेकडून शक्य ते सारे प्रयत्न होत आहेत. मग त्यासाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळे हे तुंबलेल्या मुंबईची जबाबदारी मोदी सरकारवर टाकताना दिसत आहेत, तरी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे हे कंत्राटदाराला दोष देत स्टंटबाजी करताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात भाजपाचे राज्यपालांकडे निवेदन
पीएम केअर्स…८५० जिल्ह्यांत उभे राहतायंत ऑक्सिजन प्लॅन्ट
जमीन खरेदी विषयावरून राम मंदिर विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार
जेव्हा देशाचे पंतप्रधान मोदींनी प्रत्यक्ष मदत केली होती…
रविवार, १३ जून रोजी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदाराला भर रस्त्यात बसवून त्याच्यावर नाल्यातील गाळ टाकण्याचा प्रताप केला. पहिल्याच पावसात तुंबलेल्या मुंबईमुळे कंत्राटदाराला दोषी धरत आमदार महोदयांनी ही स्टंटबाजी केली. पण त्यांच्या या स्टंटबाजी चे विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण त्या कंत्राटदाराला आता श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.
नालेसफाई कंत्राटदारावर कचरा टाकण्याचा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या कंत्राटदाराला श्वसनाचा त्रास सुरू झाला. हा त्रास इतका जास्त होता की लगेचच त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. त्यांना बोरीवलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्या रुग्णालयात या कंत्राटदारावर उपचार सुरू आहेत. पण शिवसेना आमदारांच्या स्टंटबाजीमुळेच त्या कंत्राटदाराच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे का? असा सवाल विचारला जात आहे.