स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चिखलफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीतील मंत्री नितीन राऊत यांच्यावरच कठोर कारवाईची मागणीच केल्याचे समोर आले आहे.
काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मध्यंतरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अश्लाघ्य भाषेत ट्विट केले होते. त्यावरून नितीन राऊतना महाराष्ट्रातून तीव्र टीकेचा सामना करावा लागला होता. त्यांनी नंतर हे ट्विट डिलिट केले होते.
नाशिकच्या दौऱ्यावर असलेले संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मी ज्या भूमीवर उभा आहे, तिथे जवळच भगूर आहे, जिथे सावरकरांचा जन्म झाला. सावरकरांनी क्रांतिकारक घडविले, ब्रिटिशांना त्यांची दहशत वाटत होती, पण त्यांच्यावर काही लोक अश्लाघ्य भाषेत टीका करत असतात. टीका गांधींवर होते, टिळकांवरही होते, पण ज्या खालच्या भाषेत टीका होते, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत.
हे ही वाचा:
नियमांत राहा! व्हॉट्सऍप, फेसबुकला केंद्र सरकारने पुन्हा फटकारले!
झोमॅटोच्या ट्विटने लागली पाकिस्तानला मिरची
शरद पवार प्रचंड बहुमताने विजयी; मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणूक
कोरोनाच्या लाटेनंतर आता राज्यात डेंग्यू, चिकनगुनियाची लाट!
काँग्रेसने सातत्याने सावरकरांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केलेली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मी सावरकर नाही, गांधी आहे, असे बेताल वक्तव्य केल्यानंतर त्यावर तीव्र टीका झाली होती. मागे एका व्हिडिओच्या माध्यमातून सावरकरांची बदनामी करण्यात आली होती. त्यात सावरकरांचा फोटो वापरण्यात आला असून बॅकग्राऊंडला जस्टिन बीबर या प्रसिद्ध इंग्रजी पॉप गायकाच्या ‘सॉरी’ या गाण्याचे बोल वाजविण्यात आले होते.
यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर शरसंधान केले आहे. काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता मारू नयेत, असे ट्विट त्यांनी केले आहे.
इतके पराकोटीचे कोडगे वक्तव्य करण्यासाठी कोणत्या प्रतीचा गांजा लागतो हे राउतच सांगू शकतात. सत्तेसाठी स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये. https://t.co/D3ZLnS3z0w
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 24, 2021