माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. चीन आणि रशियाविरुद्ध लोकशाही असलेल्या देशांनी एकजूट होणे आवश्यक आहे, यासाठी काय उपाय करता येतील, या विषयावरील एका चर्चेला माजी अमेरिकी राजदूत निकोलस बर्न्स हे संबोधित करत होते. “लोकशाही असलेल्या देशांनी एकत्र येऊन चीन आणि रशिया विरुद्ध उभं राहण्याची आवश्यकता आहे.” असं ते सांगत असतानाच, राहुल गांधींनी त्यांना मधेच थांबवलं आणि म्हणाले, “मग भारतात जे काही घडतंय त्यावर अमेरिका काहीच का बोलत नाही?”
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांनी निवडणुकीच्या प्रचारातच सांगितले होते की ते राष्ट्रपती झाले तर चीन विरुद्ध लोकशाही असलेल्या देशांची एक फळी ते उभी करतील. याच प्रयत्नाचा भाग म्हणून ही परिषद बोलावली गेली होती. यावेळी, चीनमध्ये उइघर मुस्लिमांवर होत असलेले अत्याचार, चीनचा शेजारी राष्ट्रांना असलेला सामरिक धोका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांविरुद्ध पुकारलेले ट्रेड वॉर म्हणजेच व्यापार युद्ध या विषयांवर चर्चा सुरु होती. चीनच्या या सर्व प्रयत्नांना तोंड देण्यासाठी लोकशाही असलेल्या देशांनी एकत्र येऊन चीनचा सामना केला पाहिजे असं सांगण्याचा प्रयत्न होता. परंतु याचवेळी, राहुल गांधींनी या चर्चेला थांबवत मुक्ताफळे उधळली.
हे ही वाचा:
ठाण्यात पुन्हा दिसणार वाफेचे इंजिन
नरेंद्रने टिपले ‘नरेंद्राचे’ स्मारक
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर निकाल ५ एप्रिल रोजी
भारताने केला म्यानमारमधील हिंसाचाराचा निषेध
“भारतात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत, काश्मीरमध्ये भारत सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे.” असे आरोप आजवर अनेकवेळा राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले. परंतु आता राहुल गांधींनी, या सर्व आरोपांवर अमेरिका का काही बोलत नाही? असा सवाल माजी अमेरिकन राजदूतांनाच केला आहे. विशेष बाब म्हणजे हा सवाल त्यांनी चीनविरुद्ध एकत्र येण्याच्या परिषेदेत उपस्थित केला. ज्या चीनमध्ये शिंजियांग प्रांतात, मोठ्या प्रमाणात छळछावण्या उभारून उइघर मुस्लिमांना मारलं जात आहे. चीनच्या या धोरणांविरुद्ध राहुल गांधींनी आजवर एक चकार शब्द देखील काढलेला नाही.
अशा प्रकारे काश्मीरमधील तथाकथित मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल बोलणारे आणि चीनमध्ये सुरु असलेल्या हत्याकांडाबद्दल अवाक्षर न बोलणारे राहुल गांधी एकटेच नाहीत. पाकिस्तानसुद्धा याच प्रकारे काश्मीरमधील कपोलकल्पित घटनांवर भाष्य करतो पण चीनमधील हिंसाचारावर मात्र मूग गिळून गप्प असतो. त्यामुळे राहुल गांधींच्या या विधानांनंतर राहुल गांधी कोणाच्या पंगतीत बसले आहेत, हे स्पष्ट आहे.