ठाकरे गटाच्या खासदार आणि पक्षाचा दिल्लीतील चेहरा अशी ओळख असणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी या ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून वेगळा मार्ग निवडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ठाकरे गटाशी असलेले संबंध तोडून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात सामील होणार आहेत, असे बोलले जात आहे. या चर्चांमुळे ठाकरे गटामध्ये खळबळ उडाल्याचेही बोलले जात आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटी दरम्यान, प्रियंका यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या चर्चांना उधाण आलेले असतानाचं प्रियंका चतुर्वेदी यांनी एक ट्वीट केले आहे. “एक पत्रकार ज्याला सर्वांना ‘गोदी पत्रकार’ म्हणायला आवडते, पण कॉर्पोरेट क्लायंटसाठी अजेंडा सुरू ठेवतो, तो माझ्याबद्दल खोटे पसरवत आहे. या व्यक्तीने आधीही प्रयत्न केले होते. आता त्याने पुन्हा त्यांच्या इशाऱ्यावर काम सुरू केले आहे. कोणाच्या इशाऱ्यावर ते आपण सर्वजण जाणतो. सुरू ठेवा काम, आशा आहे की तो क्लायंट तुमच्यावर काही तुकडे फेकेल जसे तुम्ही जेलबर्डसारखे ट्रोलवर फेकले असतील.”
प्रियंका चतुर्वेदी यांचा राज्यसभेतील कार्यकाळ पुढील ११ महिन्यांत संपणार आहे. त्यांना ठाकरे गटाकडून पुन्हा राज्यसभेत जायला मिळण्याची शक्यता फारचं कमी आहे. विधानसभेत मिळालेला अपयशामुळे महाविकास आघाडीसाठी राज्यसभेचे गणित फारचं कठीण असणार आहे. हे पूर्वीचं स्पष्ट झालेले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडी एकत्रितपणे त्यांच्या एका सदस्याला राज्यसभेत पाठवू शकते. पण त्यासाठी तिन्ही पक्षांना एकाच नावावर सहमती असणे आवश्यक असेल. शरद पवार आणि प्रियांका चतुर्वेदी यांची ३ एप्रिल २०२० रोजी सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली होती, तर राऊत यांची निवड जुलै २०२२ मध्ये झाली होती. शरद पवार आणि प्रियांका चतुर्वेदी दोघांचाही कार्यकाळ ३ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. तर राऊत यांचा कार्यकाळ २२ जुलै २०२८ रोजी संपणार आहे. त्यामुळे आता प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेत जाण्याची संधी मिळणार का हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यामुळेचं त्या नवा पर्याय शोधत असल्याचे बोलले जात असून राजकीय वर्तुळात या पक्ष बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. संसद सदस्य बनवण्याच्या अटीवर त्या पक्ष बदलू शकतात असे बोलले जात असून तसे झाल्यास ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का ठरेल.
हे ही वाचा :
सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध MUDA प्रकरणात पुढील चौकशीचे आदेश
बंगाल वक्फ हिंसाचारात बांगलादेशी बदमाशांचा सहभाग!
‘हिंदू देवतांमध्ये शक्ती असती तर आक्रमकांना शाप देत नष्ट केले असते!’
डिजिटल अरेस्टप्रकरणी चार जणांच्या मुसक्या आवळल्या; ७.६७ कोटींची झालेली फसवणूक
काही महिन्यांपूर्वी पॉडकास्ट चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत, प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. आजच्या काळातील महान राजकारणी कोण या प्रश्नावर त्यांनी नरेंद्र मोदींचे नाव घेत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. त्यावेळी त्यांच्या या बदलत्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.