सनसनाटी निर्माण करण्यासाठी पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि पत्रकारांना काहीतरी खाद्य पुरवायचे, एवढाच उद्देश असलेल्या अनेक पत्रकार परिषदा महाविकास आघाडीतील नेत्यांनी गेल्या दीड-दोन वर्षांत आयोजित केल्या. त्याचाच पुढचा भाग म्हणजे नवाब मलिक यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (एनसीबी) आरोप करणारी पत्रकार परिषद. क्रूझवर एनसीबीने टाकलेल्या छाप्यात भाजपाशी संबंधित कार्यकर्त्याला का सोडले हा सवाल उपस्थित करण्यासाठी घेतलेल्या या पत्रकार परिषदेचा आणखी एक उद्देश होता तो एनसीबीला लक्ष्य करणे. बाकी या पत्रकार परिषदेतून मलिक यांच्या हाती काहीही लागले नाही. सगळ्या प्रसारमाध्यमांनी मलिक यांच्या अपेक्षेप्रमाणे त्याची बातमी केली, त्यावर चुरचुरीत चर्चा घडविल्या. त्या पलिकडे यातून काहीएक निष्पन्न झाले नाही.
मलिक यांचा जावई समीर खान याला गेले आठ महिने अमली पदार्थ प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती. तो जामिनावर सुटेपर्यंत मलिक यांनी काहीएक भाष्य केले नाही. पण त्याची जशी सुटका झाली तसे त्यांनी एनसीबीला लक्ष्य करण्यास प्रारंभ केला हे या पत्रकार परिषदेवरून दिसून आले. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नवाब मलिक यांना जे काही राजकीय भाष्य करायचे आहे ते त्यांनी करावे. त्यांना कोणत्या राजकीय पक्षावर आरोप करायचे तेही त्यांनी करावे. पण त्यापलिकडे जाऊन ते एनसीबीला लक्ष्य करताना म्हणतात की, एनसीबीने केलेली सगळी कारवाई ही बनावट होती. हा जेव्हा ते आरोप करतात त्यासाठी त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत, ते मात्र ते अजिबात पत्रकारांकडे देत नाहीत. पत्रकारही त्यांना त्याबाबत काही विचारत नाहीत. त्यामुळे पत्रकार परिषदेत कोणतेही आरोप करायचे आणि पत्रकारांनी ते छापायचे, यापलिकडे काही झालेले दिसत नाही.
एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन किती जणांना अटक केली, किती जणांना सोडले, किती मुद्देमाल हस्तगत केला, किती रोकड पकडली, कोण न्यायालयीन कोठडीत आहे, कोण एनसीबीच्या कोठडीत आहे, याविषयी माहिती दिली. ज्या क्रूझवर एनसीबीने छापा मारला, त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सापडला. त्याला रीतसर अटक करून त्याला महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याच्या जामिनासाठी त्याच्या वकिलांनी प्रयत्न केले पण तो मिळाला नाही. यावर नवाब मलिक यांचा विश्वास नाही. त्यांना यात कोणता खोटारडेपणा वाटतो? म्हणजे थोडक्यात महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे चाललेली कारवाई हीदेखील बनावट आहे, असेच मलिक यांना म्हणायचे आहे का? एनसीबीने नियमांच्या अधीन राहून छापेमारी केलेली आहे. ते पुरावे, साक्षीदार यांना ते न्यायालयापुढे ठेवणार आहेत आणि तशीच पद्धत आहे. एनसीबीने आर्यन खानचे अपहरण केलेले नाही किंवा त्याला वरिष्ठांकडे नेऊन ‘द्या आता याला शिक्षा’ असेही म्हटलेले नाही. कायदेशीर पद्धतीने सगळे चालले असेल तर मलिक यांचा नेमका आक्षेप कशाला आहे? सगळेच बनावट आहे मग खरी कारवाई कशी करतात, हे मलिक यांनी काही सांगितलेले नाही.
बरे, हे सगळे आरोप ते एनसीबीवर करतात आणि त्यांच्याकडून उत्तरही मागतात. एनसीबी ही काही स्वयंसेवी संस्था नाही की ते प्रत्येक पक्षाच्या आरोपांवर उत्तरे देत बसतील. ते फार फार तर आपल्यावरील आरोप चुकीचे आहेत एवढेच सांगू शकतात. बाकी कारवाईबद्दल ते आपल्या वरिष्ठांशीच संपर्क साधू शकतात किंवा न्यायालयातच जे काही पुरावे आहेत ते सादर करू शकतात. पण हे माहीत असतानाही नवाब मलिक एनसीबीने अमूक माणसाला का पकडले, का सोडले असे विचारत राहतात तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही आणि मग त्यांची ही पत्रकार परिषद निव्वळ एक सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे हे स्पष्ट होते. एनसीबी ही एनसीपीला उत्तरदायी नाही, हे मलिक यांना ठाऊक नाही का? तरीही ते आरोप करतात. यासंदर्भात त्यांचे जे काही आरोप आहेत, ते त्यांनी लेखी स्वरूपात न्यायालयात सादर केले आहेत का? न्यायालयात या सगळ्या बाबी समोर आणण्याची त्यांची तयारी आहे का, याविषयी ते गप्पच असतात. मग केवळ पत्रकारांपुढे आरोपांची राळ उडवायची आणि दोन दिवस चर्चा होऊ द्यायची, हा उद्देश स्पष्ट दिसतो.
हे ही वाचा:
उत्तरप्रदेशात भाजपा सत्ता राखणार तर पंजाबमध्ये त्रिशंकू
समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घेणारा मोदींसारखा नेता नाही!
शिष्यवृत्तीच नाही, फिजिओथेरपिचे निवासी डॉक्टरही संपावर
आरीफ मोहम्मद खान म्हणतात, अल्पसंख्य ही संकल्पनाच मान्य नाही, मी भारतीय आहे!
याच पत्रकार परिषदेत ते म्हणतात की, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स मुंबई पोलिसांनी तपासले पाहिजेत. हा मुंबई पोलिसांच्या माध्यमातून एनसीबीच्या अधिकाऱ्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न आहे. आता यावर ईडी, सीबीआय कशी सूडबुद्धीने कारवाई करते वगैरे सांगत वेगळे वळण देण्यास प्रारंभही होईल. पण या सगळ्या संस्था रितसर नोटिसा पाठवूनच कारवाई करत आहेत. ती कायदेशीर प्रक्रियाच आहे. त्याला प्रत्येकाला सामोरे जावेच लागेल. अनिल देशमुखांनाही ईडीने समन्स पाठवले पण ते हजर राहात नाहीत. म्हणून त्यांना शोधून उचलून आणलेले नाही. न्यायालयानेच आता त्यांना समन्स पाठविले आहे. या सगळ्या कायदेशीर प्रक्रियांतून प्रत्येकाला जावेच लागणार आहे.
याउपर नवाब मलिक हे आर्यन खानला झालेली अटक, अमली पदार्थांचा व्यापार याबाबत एनसीबी करत असलेल्या कारवाईबद्दल एक शब्दही काढत नाहीत. आर्यन खानला झालेली अटक ही त्यांना रुचलेली नाही म्हणून ते एनसीबीवर आरोप करतात का? हे कळत नाही. एनसीबीने कुणाला अटक केली, का केली, कुणाला सोडले, का सोडले याची उत्तरे न्यायालयीन प्रक्रियेत सापडणारच आहेत. त्यासाठी थांबण्याची मलिक यांची तयारी नाही. न्यायालयीन प्रक्रियेच्या आधीच त्यांना सगळी उत्तरे हवी आहेत. भाजपाचा काहीतरी संबंध आहे, असे ढोल पिटायचे आणि त्यातून ती प्रक्रियाच कशी बनावट आहे असे सांगत धूळफेक करायची, हेच या सगळ्या आरोपांतून दिसून येते. त्यामुळे खळबळ उडविण्याचा आणखी एक प्रयत्न यापलिकडे या पत्रकार परिषदेला महत्त्व नाही.