शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्या प्रकरणी मराठी अभिनेता मयुरेश कोटकरला अटक करण्यात आलीय. ठाण्यातील श्रीनगर पोलिसांकडून मयुरेश कोटकरला अटक करण्यात आली आहे. कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या अटक प्रकरणात भाजपाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारलाय. नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मयुरेश कोटकर यांच्यावर सूड उगवला जात नाही ना? असा सवाल दरेकर यांनी केलाय.
महाविकास आघाडीच्या विरोधात एखाद्या व्यक्तीने स्पष्ट भूमिका मांडली, तर त्याला अटक होणे, गुन्हे दाखल होण्याचा प्रकार सरकारमध्ये घडतोय.
लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याच्या आंदोलनात मयुरेश कोटकर सहभागी असल्यामुळे त्यांच्यावर सूड उगवला जातोय का? pic.twitter.com/HTmhGu9SN4— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 15, 2021
‘लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल पिटत असताना कोटकर नावाच्या व्यक्तीला अशाप्रकारे अटक करणं निंदनीय आहे. कोटकर हा नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं ही मागणी करणाऱ्या आंदोलनात सहभागी होता. फेसबूकच्या माध्यमातून अनेकजण बोलत असतात, व्यक्त होत असतात. पण केवळ आपल्याबद्दल बोललं म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करा, अटक करा हे चूक आहे. ठाण्यातील कुरमुसे प्रकरण, काल परवा दिलीप लांडेंनी कंत्राटदारावर कचरा टाकण्याचं प्रकरण आणि आता हे प्रकरण. या सगळ्याचा मी निषेध करतो,’ अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय.
नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळीही मयुरेश कोटकर उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
हे ही वाचा:
मराठा मूक मोर्चापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी साधला संवाद
नागपुरमध्ये आशा वर्कर्सचे आंदोलन सुरु
सोनियांच्या प्रभावामुळे शिवसेना राज्यात फॅसिझम राबवतेय काय?
एकनाथ शिंदेंविरोधात ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्याला अटक
शिवसेना कार्यकर्त्यांकडून पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांना आज जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.