‘पंजाबचे मुख्यमंत्री आहेत की अरविंद केजरीवालांचे वैमानिक?’

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघात

‘पंजाबचे मुख्यमंत्री आहेत की अरविंद केजरीवालांचे वैमानिक?’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पंजाबच्या गुरुदासपूर येथील एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर घणाघात केला. ‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पंजाबमधील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही. ते अरविंद केजरीवाल यांचे ‘प्रवास नियोजक’ बनले आहेत. ते मुख्यमंत्री आहेत की पायलट?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शाह यांनी भगवंत मान यांच्यावर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत जोरदार हल्ला चढवला आणि मुख्यमंत्र्यांकडे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नसल्याचा दावा केला. ‘ते केवळ आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना देशभरात घेऊन जाण्यातच व्यग्र आहेत. त्यांचे एकच काम आहे, ते म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्यासोबत चेन्नई, कोलकाता किंवा दिल्लीला जाणे. पंजाबचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या सर्व राष्ट्रीय प्रवासाची व्यवस्था करत आहेत. ते मुख्यमंत्री आहेत की वैमानिक, हे मला समजू शकले नाही,’ अशी टिप्पणी त्यांनी केली.

भगवंत मान यांनी राज्यासमोरील समस्यांकडे डोळेझाक केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला. ‘ते आपला संपूर्ण वेळ अरविंद केजरीवाल यांच्या प्रवासात घालवतात. यामुळे पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत आहे. येथे लोक सुरक्षित नाहीत. अमली पदार्थांचा व्यापार वाढत आहे. शेतकर्‍यांची अनास्थाही वाढत आहे. पण मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही,’ अशी टीका शाह यांनी केली.

‘पंजाबमधून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे काम केले जाईल. राज्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुख्यालयाची स्थापना केली जाईल,’ असे आश्वासन यावेळी शाह यांनी दिले. ‘दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. पंजाबच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक दलित महिलेच्या शोषणात गुंतला आहे,’ असा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यांनी ‘आप’ सारखा खोटी आश्वासने देणारा राजकीय पक्ष पाहिला नाही, असेही म्हटले.

‘आज, मी येथे अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांना प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. तुम्ही प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. याची राज्यातील सर्व माता-मुली आतुरतेने वाट पाहत आहेत. एक हजार रुपयांचे काय बोलणार? एक हजार पैसेही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत,’ अशी टीका त्यांनी केली.
शाह यांनी मान यांना खाणमाफियांवर कारवाई करून किती महसूल मिळवला, हे जाहीरपणे सांगण्याचे आव्हान दिले. आप म्हणाले होते की, ते खाणमाफियांवर कारवाई करून २० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवतील. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, केवळ १२५ कोटी रुपये वसूल केले गेले आहेत, जे आधीच्या सरकारांनी वसूल केलेल्या रकमेपेक्षाही कमी आहेत, असे शाह म्हणाले. ‘आप’ने गरीब मुलींच्या लग्नासाठी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी हजारो अर्ज आले होते, पण एकाही लाभार्थ्याला मदत मिळाली नाही,’ असा दावाही त्यांनी केला.

हे ही वाचा:

प्रकाश आंबेडकरांच्या ‘औरंगजेब’ भेटीबद्दल उद्धव ठाकरे गप्पच!

छत्तीसगडमध्ये महिला काँग्रेस नेत्यांने केले हिंदुराष्ट्रासाठी आवाहन

स्वस्तिक साईराज-चिरागने रचला इतिहास

गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते हे बोलण्याचा पालिकेला अधिकारच काय?

शाह यांनी अमृतसरमध्ये एक महिन्याच्या आत एनसीबीचे मुख्य कार्यालय उभारले जाईल आणि काही दिवसांत भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन नशेच्या विरोधात जनजागृती करतील, असे शाह यावेळी म्हणाले होते. यावर आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली. ‘केंद्रीय गृहमंत्री एनसीबी कार्यालय उघडत आहेत की भाजपचे मुख्यालय? मग एनसीबी, भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावोगावी काम कसे करणार? याचा अर्थ राज्यात अंमली पदार्थांचा सामना करण्यासाठी तुम्हाला काही करायचे नाही. भाजप एनसीबीच्या नावाने जाहिरातबाजी करत आहे. तुमच्या अकाली दल पक्षाच्या कार्यकाळातच अंमली पदार्थांचा वापर वाढला होता,’ असा आरोप केजरीवाल यांनी केला.

Exit mobile version