पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पंजाब येथे दौऱ्यासाठी गेले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा दौराच रद्द झाला आहे. सुरक्षेमध्ये त्रुटी असल्यामुळे हा दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने गांभीर्याने याची दखल घेतली असून या घटनेचा अहवाल पंजाब सरकारकडून मागवला असून याची जबाबदारी कोण घेणार हे पंजाब सरकारने ठरवावे आणि दोषींवर कारवाई करावी, असे म्हटले आहे.
मोदी आज पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. त्यानुसार आज सकाळी पंतप्रधान भटिंडा येथे उतरले तेथून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते. मात्र, पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामान सुधारले नाही, तेव्हा रस्त्याने जायचे असे ठरवण्यात आले. डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यास निघाले.
हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर जेव्हा पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा तेथे काही आंदोलकांनी रस्ता अडवला असल्याचे दिसून आले. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा १५ ते २० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकला होता. एका बाजूने पंतप्रधान यांचा ताफा जात असताना उड्डाणपुलावर आंदोलक वावरताना दिसत असल्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
Big Security breach in PM’s Convoy as u can see protesters running along side of PM’s car pic.twitter.com/HLd1c7drno
— Gagandeep Singh (@Gagan4344) January 5, 2022
पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यासाठी सुरक्षेसाठी आवश्यक आणि अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र, अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पुन्हा भटिंडा विमानतळाकडे वळवण्यात आला आणि त्यांची सभा पुढे ढकलण्यात आली.
Security breach in PM Narendra Modi's convoy near Punjab's Hussainiwala in Ferozepur district. The PM's convoy was stuck on a flyover for 15-20 minutes. pic.twitter.com/xU8Jx3h26n
— ANI (@ANI) January 5, 2022
या गंभीर सुरक्षेतील त्रुटींची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून याविषयीचा सविस्तर अहवाल मागवला आहे. राज्य सरकारलाही या चुकांबद्दल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. शेतकरी कायदे रद्द केल्यावर पंतप्रधानांचा हा पहिला पंजाब दौरा असणार होता.