काँग्रेसचे मुंबई जिल्हा प्रमुख भाई जगताप यांनी आर्यन खान प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. भाई जगताप यांच्या फेसबुक पोस्टमध्ये आर्यन खानचे अपहरण झाले आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी आर्यन खानला अटक केली आहे की बापाकडून २५ कोटींच्या खंडणीसाठी पोराचे अपहरण करण्यात आले आहे?
सध्या आर्यन खान हा न्यायालयीन कोठडीत आहे. कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीदरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. तेथे त्याला जामीन मिळाला नाही. नंतर मुंबई उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज करण्यात आला तिथेही त्यावर अद्याप सुनावणी सुरू आहे आणि आर्यन खान आता आर्थर रोड येथे न्यायालयीन कोठडीत आहे.
आर्यन खानविरोधात जी कारवाई झालेली आहे ती कायदेशीर पद्धतीने झालेली आहे. जामीनासाठी आर्यन खानच्या वतीने वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करण्यात आले आहेत. तरीही हे अपहरण असल्याची शंका भाई जगताप यांनी व्यक्त केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
हे ही वाचा:
सत्र न्यायालयाने का फेटाळली समीर वानखेडेंची याचिका?
अमित शहा यांनी काश्मीरमधील स्थानिकाचा नंबर का केला सेव्ह?
‘नवाब मलिकांच्या जावयाला पकडल्यामुळेच ते आमच्या मागे’
हा ढोंगीपणा का? सगळं ज्ञान दिवाळीलाच का आठवतं
सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समीर वानखेडेंविरोधात आघाडी उघडली आहे, असे चित्र समोर येते आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे पत्रकार परिषदा घेऊन ही कारवाई बनावट असल्याचे आरोप करत आहेत. त्यांनीही समीर वानखेडे यांना लक्ष्य केले आहे.