बांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण ‘वाढविण्याची’ सोय?

बांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण ‘वाढविण्याची’ सोय?

बांद्रा रेक्लेमेशन येथे नाताळ आणि नव वर्षाचे औचित्य साधून भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली असून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही वंडरलॅंड साकारण्यात आली आहे. या वंडरलॅंडला भेट देण्यासाठी हजारो नागरिक या ठिकाणी येत आहेत. मात्र, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे असे म्हटले जात असताना आणि नवनवे निर्बंध लागू करण्यात येत असताना या बेशिस्त गर्दीमुळे कोरोना रुग्ण वाढविण्यासाठी हा प्रयोग चालला आहे की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बांद्रा रेक्लेमेशन येथील ही भव्य रोषणाई एमएसआरडीसी (MSRDC) आणि जिओ (JIO) यांच्या मदतीने सरकारने केली आहे. राज्यात कोरोना आणि ओमिक्रोन बाधितांची संख्या वाढत असताना या वंडरलॅंडमुळे कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कार्यक्रमांच्या उपस्थितीवरही निर्बंध लावण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्र्यांचे पत्र धमकीवजा’

मालेगाव बॉम्बस्फोट: योगींचे नाव घेण्यास परमबीर सिंग यांनी सांगितले

पुण्याची डॉक्टर ठरली ‘पॉवर’फुल

डॉलरच्या बदल्यात चक्क रिन साबणाच्या वड्या

हे निर्बंध लावलेले असताना दुसरीकडे वंडरलॅंडमध्ये मात्र नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत आहेत. या वंडरलॅंडमध्ये फिरताना सुरक्षित अंतर नागरिक पाळत नसून बहुतांश लोक मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. देशात ७०० पेक्षा जास्त ओमिक्रोन रुग्णांची नोंद झाली असून राज्यात १६७ रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे लोकांना नियम पाळायला सांगून दुसरीकडे सरकारनेच कोरोनाला आमंत्रण देण्यासाठी वंडरलॅंड सारखे कार्यक्रम आयोजित केले आहेत की काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

Exit mobile version