भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषि कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांचे दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आता संपुष्टात आले आहे, पण पुन्हा एकदा कृषि कायदे परतणार, अशा बातम्यांनी चर्चेला सुरुवात झाली आहे.
कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात असा उल्लेख केला की, आम्ही जे तीन कृषि कायदे केले ते काही लोकांना पसंत पडले नाहीत. पण स्वातंत्र्याला ७० वर्षे झाल्यानंतर ही एक मोठी सुधारणा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याच्या माध्यमातून होत होती. पण सरकार निराश नाही. आम्ही एक पाऊल मागे घेतले, पण आम्ही पुन्हा पुढे वाटचाल करू. कारण भारतातला शेतकरी हा भारताचा कणा आहे.
नरेंद्र तोमर यांच्या या वक्तव्यानंतर तिन्ही कृषि कायदे परत आणणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यावर मग काँग्रेसने प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. राहुल गांधी यांनी ट्विट करत कृषि कायदे परत आणले तर आम्ही पुन्हा सत्याग्रह करू असे ट्विट केले. प्रत्यक्षात नरेंद्र तोमर यांनी आपल्या या भाषणात कुठेही कायदे पुन्हा आणणार असे वक्तव्यही केलेले नाही.
हे ही वाचा:
लुधियाना कोर्टात पोलीस कर्मचाऱ्यानेच घडवला बॉम्बस्फोट
८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन
‘त्या’ वक्तव्याबद्दल अजित पवार यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे!
पालिकेचे सफाई कर्मचारीच करतायत कचरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे तिन्ही कायदे मागे घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांनी हळूहळू माघार घ्यायला प्रारंभ केला. या शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली, हरयाणा या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते. त्याबद्दल न्यायालयानेही वारंवार रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले पण शेतकरी आंदोलक तिथून हटायला तयार नव्हते. सर्वोच्च न्यायालयात या कायद्यांना स्थगितीही देण्यात आली होती. त्यामुळे या कायद्यांची अंमलबजावणीही झालेली नव्हती.