विरारचे जळीत कांड ही नॅशनल न्यूज नाही, आरोग्यमंत्र्यांचे निबर विधान

विरारचे जळीत कांड ही नॅशनल न्यूज नाही, आरोग्यमंत्र्यांचे निबर विधान

शुक्रवारी पहाटे विरार येथे अग्नितांडव पहायला मिळाले. विजय वल्लभ या कोविड रूग्णालयाला लागलेल्या आगीत तेरा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची तिव्रता इतकी होती की थेट पंतप्रधानांनीही याची गंभीर दखल घेत मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहिर केली. पण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मात्र “ही घटना नॅशनल न्यूज नाही” असे अतिशय धक्कादायक आणि बेजबाबदार विधान केले आहे.

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ हाॅस्पिटलमध्ये ९० रूग्ण कोविडवर उपचार घेत होते. हाॅस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभाग होता. या अतिदक्षता विभागात एकूण १७ रूग्ण उपचार घेत होते. शुक्रवारी पहाटे तीन-सव्वा तीनच्या सुमारास अतिदक्षता विभागातील एसीच्या काॅम्प्रेसरचा स्फोट झाला आणि अतिदक्षता विभागात आग लागली. बघता बघता ही आग पसरत गेली.

हे ही वाचा:

विरार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मोदींचा मदतीचा हात

विरारच्या विजय वल्लभ हाॅस्पिटलमध्ये अग्नितांडव

पश्चिम बंगालमध्ये ७९.११% मतदान

‘आशिकी’चा सूर हरपला

यात हाॅस्पिटलचा दुसरा मजला जळून बेचिराख झाला आहे. अतिदक्षता विभागातील १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अतिदक्षता विभागातील ४ रूग्ण आणि हाॅस्पिटलचे कर्मचारी हे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले आणि बचावले. त्यापैकी २ रूग्णांची प्रकृती सध्या गंभीर आहे. सध्या या हाॅस्पिटलमधील रूग्णांना दुसरीकडे हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेसंदर्भात निबर विधान केले आहे. “ही घटना राष्ट्रीय घटना नाही.” अशी प्रतिक्रिया टोपेंनी माध्यमांशी बोलताना दिली. टोपेंच्या या विधानाबद्दल राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राजेश टोपे यांच्या या विधानावरून त्यांना फैलावर घेतले. किती दगडाच्या काळजाची माणसे आहेत ही? अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली तर “तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो” असेही ते म्हणाले.

Exit mobile version