केजरीवाल काही भारताचे प्रवक्ते नाहीत!

केजरीवाल काही भारताचे प्रवक्ते नाहीत!

सिंगापूरमधील कोरोना व्हायरस हा लहान मुलांसाठी घातक आहे, असे वक्तव्य करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. केजरीवाल हे भारताचे प्रवक्ते नाहीत. त्यांची अशी बेजबाबदार वक्तव्ये दृढ आणि जुन्या मैत्रीमध्ये विघ्न आणू शकतात, असे ट्विट जयशंकर यांनी केले आहे. हा व्हायरस लहान मुलांसाठी घातक आहे, त्यामुळे सिंगापूरमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालावी अशी मागणी केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यावरून जयशंकर यांनी केजरीवाल यांना सुनावले. सिंगापूर सरकारनेही अशाप्रकारचा कोणताही व्हायरस नसल्याचे स्पष्ट केले आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची आकडेवारी काहीशी कमी होताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेपासून सावध राहण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय सरकारकडून आखले जातायेत. अशात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन लहान मुलांसाठी घातक असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन भारतात तिसऱ्या लाटेच्या रुपात येऊ शकतो, असा इशाराही अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून सिंगापूरची हवाई वाहतूक तात्काळ थांबवण्याचं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केलं आहे. तसेच लहान मुलांना लस उपलब्ध होण्याच्या पर्यायांवर प्राथमिकतेच्या आधारावर काम होणे गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं.

हे ही वाचा:

बंगाली हिंदूंच्या प्रश्नावर १५ दिवसांनी न्यायालयाला आली जाग

मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा

केरळातील डाव्यांची घराणेशाही उघड

विरोधी पक्षनेत्यांनंतर मुख्यमंत्र्यांना जाग

गेल्या काही दिवसांपासून सिंगापूरमध्ये कोरोनाच्या आकडेवारीत वेगाने वाढ होते आहे. या पार्श्वभूमीवर १४ मे रोजी सिंगापूरमध्ये लोकांना एकत्र येणे आणि तसेच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने इतर गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

Exit mobile version