इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि काही वरिष्ठ अधिकारी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी वायव्य इराणमधील जोल्फा याठिकाणी कोसळल्याचे वृत्त आहे. या घटनेत नेमके काय झाले आहे, कोण जखमी आहे वगैरे माहिती मिळालेली नाही.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसेन अमिराब्दुल्लाहिन यांना मोठा धोका आहे. अझरबैजान येथे झालेल्या कार्यक्रमाहून परतत असताना हा अपघात घडला आहे.
सूत्रांनी म्हटले आहे की, आम्ही अजूनही आशावादी आहोत पण जिथे हेलिकॉप्टर कोसळले आहे तिथून आलेल्या वृत्तानुसार परिस्थिती चिंतेची आहे. याआधी असे वृत्त होते की, हेलिकॉप्टर जमिनीवर उतरले मात्र ते उतरताना जोरात आपटले. मात्र नंतर इराणच्या सरकारी वृत्तानुसार हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. ते कोसळले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यावर काही गिर्यारोहक शोधकार्यासाठी पाठविण्यात आले आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार वातावरण अत्यंत थंड आहे. शिवाय, वातावरण खराब असल्यामुळे तिथे विमानाच्या माध्यमातून शोधकार्य करणेही शक्य नाही. त्यामुळे जमिनीच्या माध्यमातूनच शोधकार्य पुढे नेले जाईल.
हे ही वाचा:
‘मुख्यमंत्री केजरीवाल हे धूर्त, अहंकारी अन सर्वात मोठे बेईमान’
गोंधळामुळे राहुल गांधी, अखिलेश यांचा भाषण न करताच काढता पाय!
‘शहाजहानला वाचवण्यासाठी टीएमसीचे लोक संदेशखालीच्या बहिणींना दोष देत आहेत’
मालीवाल यांच्यावरील हल्ला जीवघेणा असू शकतो
राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरसोबत आणखी दोन हेलिकॉप्टरही होते पण ती सुरक्षित पोहोचली. राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री, इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे राज्यपाल, तसेच सुरक्षारक्षक व इतर अधिकारी होते.
१९ मे रोजी रईसी हे अझरबैजानला गेले होते. तिथे एका धरणाचे उद्घाटन करण्यात आले. इराण आणि अझरबैजान या दोन देशातील संबंध बिघडलेले आहेत. इराणमधील अझरबैजानच्या दुतावासावर गेल्या वर्षी हल्ला झाला होता. शिवाय, अझरबैजानचे इस्रायलशीही संबंध आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल चिंता प्रकट केली आहे.