एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला येऊन तीन महिने झालेले असताना महाराष्ट्रातील वातावरण हे उद्योगासाठी पोषक नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांवर आरोप झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पवारांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा. पण आरोप खोटे ठरले तर काय करणार ते सांगा.
महाराष्ट्रातील उद्योगाबाबत शरद पवार म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. तो महाराष्ट्रात झाला असता तर बरे वाटले असते. मी मुख्यमंत्री असताना गुंतवणूकदारांसाठी रोज दोन तास द्यायचो. त्यावेळी राज्यात गुंतवणुकीचे वातावरण चांगले होते. पण आता हे वातावरण राहिलेले नाही.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीवर पडला पडदा, चित्रपटाचा पडदा उघडला
मंदिरे आणि हिंदू प्रतीकांवर हल्ल्याच्या निमित्ताने या देशांना भारताने फटकारले
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन का झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खुश?
पत्राचाळ प्रकरणातील पैशांनी संजय राऊतांनी ठाकरे चित्रपटाची निर्मिती केली
दसरा मेळाव्याबद्दलही शरद पवार बोलले. ते म्हणाले की, या मेळाव्यावरून वाद निर्माण होऊ नये. उद्धव ठाकरे यांनी आधी मागणी केली असेल तर त्यांनाच संधी द्यायला हवी. त्यासाठी विलंब करू नये. सामंजस्याने प्रश्न सोडवायला हवा.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन बारामतीत येत आहेत यावरून शरद पवार यांनी त्याचे स्वागत केले आणि त्या येत असतील तर चांगलेच आहे, अशी टिप्पणी केली.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला पहिले स्थान मिळाले असले तरी शरद पवार यांनी मात्र महाविकास आघाडी कशी यशस्वी ठरली हे सांगितले. भाजपा आणि शिंदे गटाला २१३ ग्रामपंचायती तर मविआला १७३ ग्रामपंचायती जिंकता आल्याचे पवार म्हणाले.
स्वतंत्र पक्ष पाहता भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या असून राष्ट्रवादीला दुसरा क्रमांक मिळाला आहे. शिवसेना मात्र पाचव्या सहाव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. शिंदे गटाने मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटापेक्षा जास्त ठिकाणी ग्रामपंचायतीत यश मिळविले आहे.