आंदोलक कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीबाबत आंतरराष्ट्रीय कुस्ती नियामक मंडळाने निषेध केला असून बृजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. हौशी कुस्तीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था असणाऱ्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) संघटनेने मंगळवारी, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणार्या कुस्तीपटूंच्या अटकेचा निषेध करून खेद व्यक्त केला. तसेच, बृजभूषण यांच्यावरील तपासात प्रगती न झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली.
हे ही वाचा:
पाद्री, मौलवींचे गणवेश, मुस्लिम महिलांच्या बुरख्यावर भुजबळ टीका करतील का?
राज्यशास्त्राच्या विषयातून ‘खलिस्तान’ला हटवले
पीएफआय प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे देशभरात धाडसत्र
राहुल गांधींनी नरेंद्र मोदी, भाजपाबद्दलचे दुखणे अमेरिकेत सांगितले
ऑलिम्पिकमधील कुस्तीच्या देखरेखीची जबाबदारीही या संस्थेवर आहे. भारतातील परिस्थितीबद्दल त्यांनी अत्यंत चिंता व्यक्त केली आहे. ‘भारतीय कुस्तीपटू महासंघाच्या अध्यक्षांवर कुस्तीपटूंनी गैरवर्तन आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. अध्यक्षांना प्रारंभिक टप्प्यात बाजूला ठेवण्यात आले असून ते सध्या प्रभारी नाहीत, हे मान्य केले तरी गेल्या काही दिवसांच्या घटनेमुळे आम्ही चिंतेत आहोत, ’ असे या संस्थेने म्हटले आहे.
२८ मे रोजी कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे कूच करण्याची योजना आखली तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यात आले. दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरील त्यांच्या आंदोलनाची जागाही मोकळी केली. या घटनेचा आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने निषेध व्यक्त केला. तसेच, त्यांनी केलेल्या आरोपाबाबत तपासाच्या अनुषंगाने काहीच प्रगती न झाल्याने खेद व्यक्त केला. महासंघातर्फे लवकरच कुस्तीपटूंच्या परिस्थितीची विचारपूस तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी पाठिंबा देण्याचा ठराव करण्यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित केली जाईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटना भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि भारतीय कुस्ती महासंघाकडे पुढील निवडक समितीबाबत अधिक माहिती मिळवण्यासंदर्भात विनंती करेल. यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली जाईल. मात्र या ४५ दिवसांत माहिती न दिली गेल्यास आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघ भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित करू शकते. त्यामुळे खेळाडूंना तटस्थ ध्वजाखाली स्पर्धा खेळावी लागेल.