नागपूरमधील इंटर्न डॉक्टर संपावर; रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

नागपूरमधील इंटर्न डॉक्टर संपावर; रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

नागपूरच्या दोन शासकीय रुग्णालये जीएसएम आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेयो) या दोन्ही रुग्णालयांतील सुमारे साडे तीनशे इंटर्न डॉक्टरांनी आजपासून संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे संपूर्ण रुग्णसेवेवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या दोन्ही रुग्णालयातील २०१६च्या एमबीबीएसच्या बॅचच्या या डॉक्टरांच्या इंटर्नशिपला सुरूवात होणार होती. मात्र आज कामावर रुजू होण्यास नकार देत या सर्व डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

हे ही वाचा:

आयपीएल २०२१ कोरोनामुळे रद्द

देशव्यापी लॉकडाऊन करा

आक्षेपार्ह ट्वीटमुळे ट्वीटरकडून कंगनाचे अकाऊंट बंद

देशभरात कोरोना रुग्णवाढीत घट

गेल्या वर्षी मुंबई, पुणे येथील इंटर्न डॉक्टरांना नेहमीच्या रुग्णसेवेच्या मानधनासोबत कोविडचे वेगळे मानधन देण्यात आले होते. त्या धर्तीवर नागपूरातील डॉक्टरांना देखील हे मानधन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याबरोबरच मुंबई, पुण्यातील डॉक्टरांप्रमाणे ५० हजारांचे मानधन मिळाले पाहिजे. प्रतिदिन जेवण, प्रवास प्रोत्साहन भत्ता म्हणून ३०० रुपये देण्यात यावेत. याशिवाय कोविड सेंटरमधील कामानंतर विलगीकरणाची सोय आणि त्याकाळात आजारी पडल्यास शासनाने उपचारांची जबाबदारी घ्यावी. यासोबतच शासनाने इंटर्न डॉक्टर्सना विमा कवच द्यावे अशा मागण्या या डॉक्टरांनी केल्या आहेत.

याबाबत अधिष्ठाता, नागपूर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सप्टेंबर २०२० मध्येच निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर अद्याप काही कारवाई झाली नसल्याने जोवर लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर आंदोलन चालू ठेवणार असल्याची भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे.

नागपूरात कोविडचे सावट अतिशय गहिरे झाले आहे. अशावेळेस साडे तीनशे इंटर्न डॉक्टरांनी संप पुकारल्याने रुग्णसेवा कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे.

Exit mobile version