नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी मंगळवारी २६ जुलै रोजी पुन्हा ईडीच्या चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. यादरम्यान, सोनिया गांधी यांना ईडीने समन्स बजावल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने देशभरात आंदोलने सुरू केली आहेत. त्याअंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. मल्लिकार्जुन खर्गे, रणजीत रंजन, केसी वेणुगोपाल, मणिकम टागोर, इम्रान प्रतापगढ़ी आणि के सुरेश यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
२१ जुलैला मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात आर्थिक तपास एजन्सीने सोनिया गांधींची जवळपास तीन तास चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने सोनिया गांधींना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले असून, सोनिया गांधी आज सकाळी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी काँग्रेसकडून आक्रमक निदर्शने केली जात आहेत. यावेळी दिल्लीच्या विजय चौक परिसरात झालेल्या आंदोलनात राहुल गांधीही सहभागी झाले होते. राहुल गांधी याठिकाणी ठिय्या देऊन बसले होते. त्यामुळे पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुद्धा ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा:
नरेंद्र मोदी तुमचे वडील नव्हते, मग त्यांचे फोटो वापरून का निवडणूक लढविली?
…म्हणून भालाफेकपटू नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धेतून घेतली माघार
अदानी-रिलायन्सपैकी कोण जिंकणार 5G स्पेक्ट्रमची बोली
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही ते शिवसैनिकांचे दैवत”
सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने सोनिया गांधी यांच्यासाठी ३९ प्रश्नांची यादी तयार केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आजच्या चौकशीदरम्यान सोनिया गांधी या प्रश्नांचा कशाप्रकारे सामना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोनिया गांधी यांच्याकडून ईडी लेखी जबाब घेणार आहेत. ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणाची २०१५ मध्ये चौकशी बंद केली होती. मात्र, पुन्हा एकदा ईडी चौकशीला सुरुवात केली आहे.