ठाकरे गटाच्या नेत्या आणि पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना शुक्रवार, १६ जून रोजी घडली. ठाण्यातल्या कळवा येथे ही घटना घडली. एका कार्यक्रमात ही घटना घडली असून त्यांना मारहाण झाल्याचेही वृत्त आहे. मात्र, मारहाणीच्या आरोपाला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. ‘सामना ऑनलाईन’ या ट्वीटर अकाऊंटवर यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर कळव्यात टोळक्याची भ्याड शाईफेक
– एका कार्यक्रमासाठी कळव्यात आलेल्या अयोध्या यांना काही जणांच्या टोळक्याने घेरले आणि शाई फेकली #shivsena #saamanaonline pic.twitter.com/fSx6BaNI6K
— Saamana (@SaamanaOnline) June 16, 2023
अयोध्या पौळ या एका कार्यक्रमासाठी ठाणे – कळवामधील मनीषा नगर येथे गेल्या होत्या. अहिल्या देवी होळकर जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सर्व महापुरुषांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला म्हणून स्थानिक महिलांनी पौळ यांच्यावर शाई फेकली. त्यांना हा ठाकरे गटाचा कार्यक्रम म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात येत असून त्याला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.
सोशल मीडियावर अयोध्या पौळ या ठाकरे गटाची बाजू मांडत असतात. शिवसेनेत उठाव झाल्यानंतर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडण्यात त्या आघाडीवर होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात असलेले आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून त्यांना धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त ट्वीटनंतर ठाणे पोलिसांनी मागितला नंबर
भाजपाने दार उघडलेले नाही, पण संकेत दिलेत…
काँग्रेसच्या कर्नाटक पॅटर्नवर उद्धव ठाकरेंचं मत काय?
आता नेहरू मेमोरियल नाही; पंतप्रधान मेमोरियल
अयोध्या पौळ यांनी हजेरी लावलेला कार्यक्रम हा ठाकरे गटाचा असल्याचे सांगत त्यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, हा ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून सापळा रचण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, खासदार राजन विचारे, ठाकरे गट ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे हे या कार्यक्रमास येणार असल्याचे सांगण्यात आले होते, असे ठाकरे गटातील काही स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अयोध्या पौळ या सोशल मीडियावर सक्रीय असून ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर नमूद केले होते. त्या मूळच्या परभणी जिल्ह्यातील असून गेली अनेक वर्षे मुंबईतचं आहेत.